Join us

"जत्रामुळे १ कोटी २० लाखांचं कर्ज झालेलं", केदार शिंदेंचा खुलासा, म्हणाले- "त्यानंतर १० वर्ष..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:30 IST

२००५ साली प्रदर्शित झालेल्या जत्रा सिनेमामुळे मात्र त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं. 

नेहमीच वेगळे विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणाऱ्या दिग्दर्शक केदार शिंदेंनी अनेक सुपरहिट सिनेमे मराठी सिनेइंडस्ट्रीला दिले आहेत. जत्रा, बाईपण भारी देवा, अगं बाई अरेच्चा, बकुळा नामदेव घोटाळे हे त्यांचे गाजलेले चित्रपट. प्रत्येक सिनेमानंतरकेदार शिंदेंनी यशाची वेगळी पायरी गाठली. पण,  २००५ साली प्रदर्शित झालेल्या जत्रा सिनेमामुळे मात्र त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं. 

केदार शिंदेंनी झापुक झुपूक सिनेमाच्या निमित्ताने रीलस्टार जस्ट नील थिंग्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत कठीण काळाबद्दल बोलताना त्यांनी जत्रा सिनेमामुळे झालेल्या कर्जाची आठवण करून दिली. ते म्हणाले, "२००५ साली मी जत्रा सिनेमा केला तेव्हा मी ३२ वर्षांचा होतो. तेव्हा माझ्या डोक्यावर १ कोटी २० लाखांचं कर्ज होतं. कारण, क्रेडिट आणि डेबिट कळलंच नाही. आपण किती खर्च करायला पाहिजे आणि आपल्याला काय मिळणारे, याचं गणित आलं नाही. जेवढी क्रिएटिव्ह लोक आहेत ती इमोशनल फूल असतात. आपण वाहवत जातो आणि आपल्याला व्यवहार कळत नाही". 

"मी पुढची १० वर्ष ते कर्ज फेडत होतो. या मधल्या काळात माझ्याकडून काही चुकीचं काम झालं असेल तर ते पैसे मला मिळत होते आणि मी कर्ज फेडत होतो. खड्ड्यात आपण पडतोच. पण, त्यात पडल्यानंतर त्या खड्ड्यातून किती वेगाने आपण उठतोय हे महत्त्वाचं असतं. सक्सेसचा कुठलाही फॉर्म्युला नसतो. बाईपण हिट झाला म्हणून पुढचे सगळे सिनेमे हिट होतील असं नाही. पण,  मी माझे प्रयत्न करणं गरजेचं आहे. बेफिकर राहून चालणार नाही आणि नेहमी पाय जमिनीवर हवेत", असंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :केदार शिंदेसिनेमा