Join us

'देवमाणूस'मधील ‘कर वार’ हे भक्तीगीत प्रदर्शित, गाण्यातून दिसली दशावताराची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:23 IST

उत्कट कथानकाने, उत्कृष्ट अभिनयाने, नेत्रदीपक दृश्यांनी आणि लोकप्रिय संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या सिनेमातील ‘कर वार’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे मुख्य भूमिकेत असलेला ‘देवमाणूस’ हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातील उत्कट कथानकाने, उत्कृष्ट अभिनयाने, नेत्रदीपक दृश्यांनी आणि लोकप्रिय संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या सिनेमातील ‘कर वार’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

आदर्श शिंदे यांच्या जोशपूर्ण आवाजातील या भक्तिगीताला प्रशांत मडपुवार यांचे शब्द लाभले आहेत. तर संगीत रोहन-रोहन या सुप्रसिद्ध जोडीने दिले आहे. या गाण्याद्वारे दशावताराचा साजशृंगार दृश्यात्मक आणि सांगीतिक पद्धतीने उभा करण्यात आला असून चित्रपटातील हा अत्यंत निर्णायक क्षण आहे, जो अतिशय प्रभावीपणे सादर करण्यात आला आहे. 

या गाण्याबद्दल गायक आदर्श शिंदे म्हणतात,  "कर वार गाणे हे माझ्यासाठी एक अत्यंत आध्यात्मिक अनुभव होता. दशावतारातील उर्जा आणि गीतांमध्ये असलेली ताकद यामुळे मी संपूर्णपणे या गाण्यात गुंतलो होतो. हे फक्त गाणे नाही, तर एक प्रार्थना आहे. ज्यातून भक्ती आणि शक्तीचा संगम झाला आहे. रोहन-रोहन यांच्यामुळे मला हे गाणे गाण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन.”

संगीतकार रोहन-रोहन म्हणतात, “कर वार बनवताना आम्हाला भक्ती आणि नाट्य यांच्यात सुंदर समतोल साधायचा होता. या चित्रपटातील इतक्या महत्त्वाच्या क्षणासाठी गाणे तयार करणे हे एक आव्हानही होते आणि आनंदही. हे गाणे प्रेक्षकांच्या मनातही तितकेच खोलवर रुजेल, अशी आम्हाला आशा आहे.”

लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शक असून लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्माते आहेत. ‘देवमाणूस’ २५ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका सिनेमात आहेत. 

टॅग्स :महेश मांजरेकर रेणुका शहाणे