Join us

एका क्षणात होत्याचं झालं नव्हतं .! रंजना यांच्या अपघातानं करिअर झाले बर्बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 07:00 IST

अभिनेत्री रंजना यांनी अनेक नायिकाप्रधान चित्रपटात काम केले. पण एका अपघाताने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रंजना यांनी व्ही. शांताराम निर्मित आणि किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.  रंजना यांना अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. रंजना या सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या कन्या होत्या तर प्रसिद्ध अभिनेत्री संध्या या त्यांच्या मावशी होत्या. त्यांनी खूपच कमी वयात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटानंतर व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटात रंजना यांनी मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार, गुपचूप या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राज्यसरकारचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. त्यांना ऐंशीच्या दशकातील सगळ्यात यशस्वी अभिनेत्री मानले जात असे. त्यांच्या अभिनयावर, सौंदर्यावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. अनेक नायिकाप्रधान चित्रपटात त्यांनी काम केले. पण एका अपघाताने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले.

रंजना १९८७ मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले. त्यांचा डावा हातही निकामी झाला. हा अपघात घडला, त्यावेळी मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकार देखील त्यांच्यासोबत गाडीत होते. पण त्यांना काहीही झाले नाही. हा अपघात घडला त्यावेळी रंजना या केवळ ३२ वर्षांच्या होत्या. रंजना या अपघातानंतर अनेक वर्षं व्हीलचेअरवरच होत्या. त्यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची १३ वर्षं ही व्हीलचेअरवर काढली.

२००० मध्ये परेल येथील त्यांच्या घरी वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराने निधन झाले. अपघातानंतर त्या अभिनयक्षेत्रापासून दूरच राहिल्या. पण त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षं आधी त्यांनी फक्त एकदाच या नाटकात काम केले होते. या नाटकातील त्यांची भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. 

टॅग्स :अपघात