मोहन जोशी (Mohan Joshi) हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ते मराठी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची अफवा व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान आता मोहन जोशी यांनी एका वृत्त वाहिनीला यावर प्रतिक्रिया देत मी ठणठणीत असल्याचं सांगितलं आहे.
मोहन जोशी यांनी एबीपी माझाला त्यांच्या निधनांच्या अफवांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "नमस्कार!...मी मोहन जोशी, माझ्याबद्दल काही वाईट बातम्या आजकाल पसरवल्या जात आहेत. तर मी सांगू इच्छितो की, मी अतिशय छान आहे तब्येतीने अगदी हट्टाकट्टा आहे, ठणठणीत आहे. आणि मुख्य म्हणजे मुंबईत निवांत आहे. ३१ तारखेला मी पुण्याला जाणार आहे. तर कृपया कुणीही अशा बातम्या पसरवू नयेत..धन्यवाद!"
वर्कफ्रंटअभिनेते मोहन जोशी यांनी चित्रपट, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात काम केलंय. त्यांनी 'सवत माझी लाडकी', 'तू मी', 'घर बाहेर', 'नॉट ओन्ली मिसेस राऊत', 'देऊळ बँड', 'मुळशी पॅटर्न' या मराठी सिनेमात काम केलंय. तर हिंदीत गंगाजल', 'वास्तव', 'इश्क', 'हसीना मान जायेगी', 'मेजर साब', 'गुंडाराज' आणि अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. चित्रपट आणि रंगभूमीवरील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षही होते.