हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. हृतानं अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. छोट्या पडद्यावरील दुर्वा, फुलपाखरू यांसारख्या मालिकांमधून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. नाटक, मालिका तसेच चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये तिचा दांडगा वावर आहे. दरम्यान, हृता सध्या चर्चेत आली आहे. नुकतंच हृता दुर्गुळेला 'महाराष्ट्र राज्य पुरस्कार २०२५' मध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण (Best Debutante) पुरस्कार मिळाला. या विशेष प्रसंगी हृताचा पती प्रतीक शाहने तिचं कौतुक केलंय.
प्रतीक शाहनं इन्स्टाग्रामवर हृतासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. हृताचा फोटो पोस्ट करत त्यानं लिहलं, "जेव्हा वाटतं की तू सर्व काही जिंकलं आहे. तेव्हा तू सर्वात मोठी ट्रॉफी घरी आणली. सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार तुला मिळाला. मला तुमचा अभिमान आहे. ठरवलेल्या मापदंडापेक्षा अशीच उंच भरारी घेत राहा. तू कायमचं माझी सुपरस्टार आहेस", या शब्दात प्रतीकनं आपल्या लाडक्या बायकोचं कौतुक केलंय. चाहत्यांनीही या पोस्टवर भरभरून प्रेम व्यक्त केलं असून, कमेंट सेक्शनमध्ये अभिनंदनाचा वर्षाव केलाय.
हृता दुर्गुळेला 'अनन्या' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला आहे. लेखक व दिग्दर्शक प्रताप फड आणि त्यांच्या टीमने अनन्या या नाटकावरून बनविलेला चित्रपट आशादायी आणि प्रेरणादायी आहे. अपघातात हात गमावलेली अनन्या आणि त्यानंतर स्वत:च्या पायावर उभं राहाण्यासाठीचा तिचा संघर्ष ही या सिनेमाची कथा आहे. हा चित्रपट २२ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. जर तुम्ही अद्याप हा सिनेमा पाहिला नसेल तर तो तुम्ही ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.