Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘होम स्वीट होम’चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 14:38 IST

‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला.

ठळक मुद्दे‘होम स्वीट होम’ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे. ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित

घर ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मोहक आणि आपलीशी संकल्पना आहे. घराचा आणि त्याच्याशी निगडीत नातेसंबंधांचा प्रवास अतिशय अनोख्या पद्धतीने विषद करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला.

फ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून लेखक अभिनेता अशी ओळख असलेले हृषीकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. घर हे केवळ चार भिंती आणि दोन खिडक्यांपर्यंत मर्यादित न राहता कुटुंबाचे सदस्य बनण्याची क्षमता असणारी वास्तू आहे, असे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वैभव जोशी यांची कविता सांगून जातात. तसेच रीमा आणि मोहन जोशी या दांपत्यामधील निखळ आणि विनोदी किस्से मनाला भावतात. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या घराच्या विक्रीतून मोठी रक्कम मिळेल हे कळताच रीमा यांची उतारवयात सर्व सुखसुविधायुक्त अशा उच्चभ्रू इमारतीतील घर घेण्याची इच्छा होते; पण घराविषयी जिव्हाळा बाळगणारे मोहन जोशी घर विकण्यास कदाचित तयार नाहीत. स्पृहा जोशी साकारात असलेली अवखळ देवीका आणि हृषिकेश जोशी यांचा साधा, मध्यमवर्गीय सोपान सुद्धा मनाला भावणारा आहे. शिवाय विभावरी देशपांडे, प्रसाद ओक, सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी यांची झलक दिसते, यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते.

‘होम स्वीट होम’ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे. संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘इकडून तिकडे तिकडून तिकडे’ हे गीत लक्ष वेधून घेते. तर सचिन पिळगांवकर यांच्या आवाजात 'हाय काय नाय काय' ऐकायला मज्जा येते. या चित्रपटाचे निर्माते हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर आहेत, तर आकाश पेंढारकर, विनोद सातव प्रस्तुतकर्ते आहेत. ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :होम स्वीट होममोहन जोशी