Join us
Daily Top 2Weekly Top 5

#BanLipstick म्हणजे नक्की काय रे भाऊ? अखेर तेजस्विनी पंडितने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 17:28 IST

Tejaswini Pandit : सोशल मीडियावर या #BanLipstick प्रकरणाची जोरदार चर्चा होती. काहींना हा प्रमोशनचा भाग वाटत होता तर काहींना पब्लिसिटी स्टंट.  चाहते संभ्रमात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय. तेजस्विनीने स्वत: पोस्ट शेअर करत त्या मागचे कारण सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर #BanLipstick हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतोय. मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी लिपस्टिक बॅन केल्याचा  व्हिडीओ शेअर केला आणि यानंतर हा हॅशटॅग ट्रेड झाला होता. सुरूवात केली होती ती अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit). 

होय, तेजस्विनीने #BanLipstick चा पहिला व्हिडीओ शेअर केला होता. तिचा हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला होता. ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही. बॅन लिपस्टिक,’ असं कॅप्शन देत तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे सगळेच गोंधळले होते. अशात अभिनेत्री सोनाली खरे आणि पाठोपाठ  प्राजक्ता माळी यांनी देखील ‘मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही’, असं म्हणत व्हिडीओ शेअर केला होता.

पण हे नेमकं प्रकरण काय? हे कळायला मार्ग नव्हता. साहजिकच सोशल मीडियावर या ‘बॅन लिपस्टिक’ प्रकरणाची जोरदार चर्चा होती. काहींना हा प्रमोशनचा भाग वाटत होता तर काहींना पब्लिसिटी स्टंट.  चाहते संभ्रमात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय.

होय,खुद्द तेजस्विनी पंडित हिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक फोटो शेअर करत या ‘लिपस्टिक बॅन’ प्रकरणाचा खुलासा केला आहे. हे प्रकरण दुसरं तिसरं काहीही नसून प्रमोशनचा भाग आहे. तेजस्विनीची ‘अनुराधा’ ही वेबसीरिज लवकरच प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतेय. या सीरिजचं पोस्टर शेअर करत, तेजस्विनीने ‘लिपस्टिक बॅन’वरून पडदा हटवला आहे.‘सध्या चर्चेत असलेलं बॅन लिपस्टिक नक्की काय आहे? त्याचंच उत्तर यात दडलंय. अनुराधा येतेय. लवकरच फक्त प्लॅनेट मराठी अ‍ॅपवर,’असं कॅप्शन तेजस्विनीने या फोटोला दिलं आहे. 

तेजस्विनीने ‘अनुराधा’बद्दल तूर्तास तरी तपशीलवार माहिती दिलेली नाही. त्यामुळे ओठांवरची लिपस्टिक पुसण्याचा कथानकाशी काय संबंध, हे अद्यापही गुलदस्त्यात आहेत. पण हो, यामुळे ‘अनुराधा’बद्दलची चाहत्यांची उत्सुकता मात्र नक्कीच शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :तेजस्विनी पंडितप्राजक्ता माळीवेबसीरिज