Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम, काळजी आणि नात्याचे नवे रंग! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील ‘जीवापाड जपतो’ गाणं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:41 IST

या गाण्याने थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.  

शुभम फिल्म प्रॉडक्शनचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट येत्या २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या  ट्रेलर आणि धमाकेदार गाण्यांनी रसिकवर्गाची मने जिंकली आहेत. अशातच चित्रपटातील आणखी एक भावनिक गाणे ‘जीवापाड जपतो’ नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून या गाण्याने थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.  

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटातील ‘जीवापाड जपतो’ हे गाणे प्रेम, काळजी आणि नात्यांच्या बंधांचे अनोखे दर्शन घडवते. हा केवळ संगीताचा अनुभव नसून एखाद्या व्यक्तीवरील निस्सीम प्रेम आणि तिची काळजी कशी घेतली जाते, याचे भावनिक चित्रण यातून दिसते. गाण्यात सुबोध भावे आणि केयामधील नातं उत्कटपणे उलगडत जाते. त्यांच्या भावभावनांमधील नाजूक क्षण या गाण्यात मांडला गेला आहे.

‘जीवापाड जपतो ’ हे गाणे मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारले असून पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केले आहे. तर  अभय जोधपुरकर यांचा या गाण्याला आवाज लाभला आहे. या चित्रपटात सुबोध भावे, तेजश्री प्रधान, प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, आणि शर्मिष्ठा राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शेखर विठ्ठल मते यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून आनंद दिलीप गोखले यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, "जीवापाड जपतो’ हे गाणं केवळ शब्दांपुरताच मर्यादित नाही तर भावना आणि नात्यांच्या गाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारं आहे. गाण्याची शब्दरचना, संगीत आणि सुबोध भावे यांचा प्रभावी अभिनय यामुळे ते प्रेक्षकांच्या हृदयात नक्कीच घर करेल. आम्हाला खात्री आहे की, हे गाणे प्रेक्षकांच्या आयुष्यातील काही खास माणसांची आठवण करून देणारे आहे.

चित्रपटाचे निर्माते शेखर विठ्ठल मते म्हणतात, "हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा मनोरंजनाबरोबरच भावनिक गोष्टींना प्राधान्य देणारा चित्रपट आहे. ‘जीवापाड जपतो’ हे गाणं प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. या कमाल संगीत टीमने या गाण्याला एक उंची दिली आहे."

टॅग्स :मराठी चित्रपटसुबोध भावे तेजश्री प्रधान संगीत