Join us

'हॅशटॅग तदेव लग्नम' आता घरबसल्या पाहा, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:13 IST

सुबोध भावे-तेजश्री प्रधानचा सिनेमा पाहायचाय?

सुबोध भावे (Subodh Bhave) आणि तेजश्री प्रधानचा (Tejashri Pradhan) 'हॅशटॅग तदेव लग्नम' (Hashtag Tadev Lagnam) मराठी सिनेमा २० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. जास्त स्क्रीन्स न मिळाल्याने हा सिनेमा काहीच ठिकाणी चालला. ज्यांनी सिनेमा पाहिला त्यांनी सर्वांनीच याचं खूप कौतुक केलं. सुबोध-तेजश्रीच्या अभिनयाचंही कौतुक झालं. मात्र ज्यांना सिनेमा पाहता आला नाही त्यांना आता घरीच तो पाहायची संधी मिळत आहे. 'हॅशटॅग तदेव लग्नम' अखेर ओटीटीवर येत आहे. कुठे आणि कधी वाचा.

आनंद गोखले दिग्दर्शित 'हॅशटॅग तदेव लग्नम' सिनेमाची खूप चर्चा झाली. मध्यमवयीन मुलगा आणि मुलगी ज्यांचं अद्याप लग्न झालेलं नाही, त्यांच्या आयुष्यात नक्की काय अडचणी आहेत, कुटुंबाचा किती दबाव असतो यावर हा सिनेमा आधारित आहे. खूप मजेशीर कहाणी आहे. आता हा सिनेमा तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे. उद्या म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आता घरबसल्या सहकुटुंब तुम्ही हा सिनेमा बघू शकता. तेजश्री प्रधानने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ही माहिती दिली आहे.

हॅशटॅग तदेव लग्नम' चित्रपटात प्रेक्षकांना आजच्या तरुणाईचे लग्नाबाबतचे विचार दाखवण्यात आले आहे. ज्यात धमाल, मजामस्ती आहेच याव्यतिरिक्त यातील काही गोष्टी भावनिकरित्या गुंतुवून ठेवणाऱ्या आहेत. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. सिनेमात सुबोध भावे, तेजश्री प्रधान, प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, आणि शर्मिष्ठा राऊत यांच्या प्रमुख भूमिका असून आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत.

टॅग्स :सुबोध भावे तेजश्री प्रधान मराठी अभिनेतामराठी चित्रपट