Join us

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना 'दशावतार'ची भुरळ, म्हणाले- "कोकणातील कला जागतिक पातळीवर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:29 IST

'दशावतार'ची गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही भुरळ पडली आहे. ‘दशावतार’ या ब्लॅाकबस्टर चित्रपटातील कलावंतांना प्रमोद सावंत यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले होते.

सध्या ज्या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे तो म्हणजे 'दशावतार'. केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली,गोवा, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्येही 'दशावतार'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. मराठी सिनेमा महाराष्ट्राबाहेरही डंका वाजवत आहे. 'दशावतार'ची गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही भुरळ पडली आहे. ‘दशावतार’ या ब्लॅाकबस्टर चित्रपटातील कलावंतांना प्रमोद सावंत यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले होते. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह माननीय मुख्यमंत्री, गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, झी स्टुडियोजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले, "सिंधुदुर्ग, कारवार येथे मोठ्या प्रमाणात होणारा दशावतार हा कलाप्रकार गोव्यामध्ये देखील तितकाच लोकप्रिय आहे. मला आनंद आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने दशावतार ही कला जागतिक पातळीवर जात आहे". यावेळी त्यांनी ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान केला आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हा चित्रपट जावा, यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दशावतार चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनींगही करण्यात आले. चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले, "एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण द्यावं आणि आम्हाला इथे बोलावणं हा आमच्या चित्रपटाचा मोठा सन्मान आहे. आम्ही कुडाळ आणि गोवा बॉर्डर परिसरातच चित्रीकरण केले आहे". 

 दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची ‘दशावतार ‘ मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असून त्यांच्या अभिनयाची जादू रसिकांना पुन्हा एकदा या चित्रपटात अनुभवता येत आहे. तर महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे , सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर अशा अनेक दमदार कलाकारांच्या या चित्रपटात अत्यंत महत्त्वाच्या भूमिका आहेत. कोकण, सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या लाल मातीतील ‘दशावतार‘ आता भारतभरातच नाही तर जगभरात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 

टॅग्स :दिलीप प्रभावळकर सिनेमा