मराठीतील काही अजरामर सिनेमांपैकी एक म्हणजे १९८४ साली प्रदर्शित झालेला 'मुंबईचा फौजदार' हा सिनेमा. रोमँटिक कॉमेडी असलेल्या या सिनेमात रविंद्र महाजनी, प्रिया तेंडुलकर, रंजना देशमुख यांच्या मुख्य भूमिका होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून या सिनेमाच्या रिमेकची चर्चा रंगली आहे. 'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक कधी येणार? याबाबत गश्मीर महाजनीला अनेकदा विचारणा होते. आतादेखील एका चाहत्याने गश्मीरला 'मुंबईचा फौजदार'च्या रिमेकबाबत प्रश्न विचारला.
गश्मीर सोशल मीडियावरुन त्याच्या चाहत्यांसोबत अनेकदा संवाद साधत असतो. आताही त्याने इन्स्टाग्रामवर Ask Me सेशन घेतलं होतं. यामध्ये त्याला एका चाहत्याने विचारलं की "तू मुंबईचा फौजदार सिनेमाचा रिमेक बनवशील का? प्राजक्ता माळी आणि तू मुख्य भूमिकेत छान दिसाल". चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना गश्मीरने 'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक बनवण्याची इच्छा व्यक्त केली.
तो म्हणाला, "मी रिमेक बनवेन. पण प्राजक्ता माळी यात काम करेल का हे मी सांगू शकत नाही". गश्मीरच्या या उत्तराने पुन्हा चाहत्यांमध्ये 'मुंबईचा फौजदार' सिनेमाच्या रिमेकची चर्चा रंगू लागली आहे. आता खरंच 'मुंबईचा फौजदार'चा रिमेक बनेल का? आणि सिनेमात कोणते कलाकार दिसणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.