Join us

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रवीण तरडेंची भावनिक साद, व्हिडीओद्वारे केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:02 IST

अभिनेते प्रवीण तरडे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

राज्यातील मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अतिवृष्टीने अक्षरशः  हाहाकार माजवला आहे. नद्यांना पूर आल्याने शेती, घरे, जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने घरांचे आणि व्यवसायांचेही मोठे नुकसान झाले आहे. डोळ्यांदेखत शेतांमधील पिकांचे होत्याचे नव्हते झाल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यामुळे जोर धरू लागली आहे.  त्यामुळे या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारकडून मदत केली जात आहे. अशा परिस्थितीत मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

प्रवीण तरडे यांनी 'शिवार संसद' या संस्थेच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी एक हेल्पलाइन सुरू केली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं, "गेल्या वेळी कोल्हापूरच्या ओल्या दुष्काळात आपण खूप मदत केली होती, आता मराठवाड्यातल्या ओल्या दुष्काळात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे".

प्रवीण तरडे यांनी व्हिडीओमध्ये ८९५५७७१११५ हा हेल्पलाइन क्रमांकाचं पोस्टर दाखवत म्हटलं की, "एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ ही ओळ लक्षात ठेवा. ज्यांना मदत करायची आहे आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी हा नंबर लक्षात ठेवा. हा नंबर खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ३६ पैकी ३१ जिल्हे बाधित झाले आहेत. १९५ तालुक्यातील २७ लाख शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमची विनंती आहे की, तुम्ही हा नंबर लक्षात ठेवा. आता मदत नसेल, पण पुढे कधीही गरज लागल्यास या नंबरवर संपर्क साधा. प्रशासन, शासकीय अधिकऱ्यांच्या सहाय्याने आपण ही मदत करत आहोत. आपल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करू. सगळ्यांनी या नंबरवर संपर्क साधा आणि याद्वारे मदतही करा".

यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये शेतकरी मायबापानो आत्महत्येचा विचार नको, फक्त एक फोन करा" असे भावनिक आवाहन केले आहे.  प्रविण तरडे व शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी म्हटलं की, "करोना संकट, वाढती महागाई, पिकांची चिंता अशा परिस्थितीत तुम्ही धीराने तोंड दिले आहे. आता हतबलता जाणवत असली तरी कृपया कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका. ही वेळही निघून जाईल, आम्ही तुमच्यासोबत आहोत". या हेल्पलाइनद्वारे समुपदेशन, मदत, सल्ला आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे. ही सेवा मोफत असून सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत उपलब्ध असेल. यासाठी कृषी विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

टॅग्स :प्रवीण तरडेमहाराष्ट्रशेतकरीपूर