प्रिया बापट (Priya Bapat) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीसह हिंदी सिनेइंडस्ट्रीत काम केलं आहे. अलिकडेच तिची अंधेरा ही हॉरर सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यात तिने पोलिसाची भूमिका साकारली आहे. त्यानंतर आता ती लवकरच 'बिन लग्नाची गोष्ट' (Bin Lagnachi Goshta Movie) सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक हे कलाकार दिसणार आहेत. दरम्यान तिने या सिनेमातील फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
प्रिया बापट हिने 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमातील फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, सगळे विचारत होते मराठी चित्रपट कधी करणार? मी पण विचारत होते कधी चांगलं कथानक येणारं? २०१८ ला आम्ही दोघी प्रदर्शित झाला. आणि आता १२ सप्टेंबर ला “बिन लग्नाची गोष्ट” येतोय. अखेर योग आला. चांगलं कथानक, अनुभवी आणि ताकदीचे सहकलाकार, मनाला भिडणारे संवाद, मोट मस्त बांधली आहे. आता तुम्ही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारी 'बिन लग्नाची गोष्ट' ही गोड कथा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कथा प्रिया, उमेश, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्याभोवती फिरणारी दिसतेय. प्रिया प्रेग्नेंन्ट असून, कामामुळे आणि छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे प्रिया -उमेशमध्ये नोकझोकही दिसतेय. या नात्यातील गोड-तिखट प्रसंग दाखवतानाच, घरात मदतनीस म्हणून गिरीश ओक आणि निवेदिता सराफ दाखल होतात आणि इथून खरी कथा रंग घेऊ लागते. प्रिया काहीशी नाराज असल्याचे दिसतेय, तिच्या नाराजीमागचे कारण काय? गिरीश-निवेदिताच्या अटी काय आहेत? आणि या चौघांच्या नात्यांचा हा प्रवास नेमका कुठे नेणार? यांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळणार आहेत. 'बिन लग्नाची गोष्ट' १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.