ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) सध्या चर्चेत आहे. त्यांचा 'दशावतार' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमात त्यांना साकारलेलं बाबुली मेस्त्री हे पात्र प्रेक्षकांच्या मनाला भिडलं आहे. दिलीप प्रभावळकरांनी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि सगळ्याच गाजल्या. त्यात आता दशावतारातील पात्राचीही भर पडली आहे. वयाच्या ८१ व्या वर्षीही त्यांनी हे पात्र अगदी लीलया साकारलं. ही भूमिका करताना शूटिंगवेळी अनेक अडचणी आल्या पण त्यांनी कधीच कोणती तक्रार केली नाही आणि स्वत:च सगळे सीन्स केले. नुकतंच एका मुलाखतीत त्यांना सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) तुम्हाला सीनिअर आहेत का असा प्रश्न गंमतीत विचारण्यात आला. त्यावर ते काय म्हणाले वाचा.
'दशावतार' सिनेमाची टीम माझा कट्टामध्ये सहभागी झाली होती. 'सचिनला तुम्ही सीनिअर आहात का? असा मिश्कील प्रश्न विचारल्यावर दिलीप प्रभावळकर गालातच हसले. आधी त्यांना वाटलं सचिन तेंडुलकर... मग म्हणाले, "नाही मी त्याला सीनिअर नाही. कारण 'हा मार्ग एकला' त्याने केला तेव्हा मी कामच करत नव्हतो. मी अगदी विसाव्या वर्षी नाही तर जरा उशिरा काम सुरु केलं. अभिनयाच्या बाबतीत तो मला सीनिअर असणार. त्याने फक्त चौथ्या वर्षी सिनेमात काम केलं होतं."
यावर नेटकऱ्यांनाही हसू आवरलं नाही. अनेकांनी प्रतिक्रिया देत लिहिले, 'सचिन पिळगावकर सगळ्या जगाला सीनिअर आहेत', 'पिळगावकर सीनिअर सिटीझनपेक्षा सीनिअर आहेत' अशा काही हास्यास्पद कमेंट आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सचिन पिळगावकरांची लेक श्रियाने वडिलांच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली होती. 'ते सगळंच खेदजनक होतं. पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झालीय की आम्हाला त्याबद्दल काही वाटेनासं झालंय. ट्रोलर्सना काहीच काम नसतं, म्हणून ते आम्हा कलाकारांवर टीका करतात. शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळतंय, त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. सोशल मीडियावरचं जग असंच आहे, त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत. कृतज्ञ राहून चांगलं काम करत राहायचं, हे आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतलं आहे."