सध्या 'दशावतार' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. या सिनेमात वयाच्या ८१ व्या वर्षी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी जो काही अभिनय केलाय त्याला तोड नाही. अनेक नवोदित कलाकारांना लाजवेल असा त्यांचा अभिनय या 'दशावतार' सिनेमात पाहायला मिळतोय. एखाद्या नटाला स्वप्नवत वाटावी, अशी बाबुलीची भूमिका दिलीप यांनी साकारली आहे. त्यांची एनर्जी, संवादफेक उत्कृष्ट आहे. कोकणातील मातीची ऊब, आपलेपणा दाखवणारा हा चित्रपट पाहून सिनेप्रेमी भारावले आहेत. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान दिलीप प्रभावळकर यांनी कोकणातील त्यांना आवडलेल्या गोष्टीबद्दल सांगितले.
दिलीप प्रभावळकर यांनी नुकतंच सकाळला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये "कोकणात तुमचे बरेच सिनेमे शूट झालेत. तर कोकणाशी तुमचं कनेक्शन कितपत आहे आणि तुम्हाला कोकणात काय आवडतं?" असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते दिलीप प्रभावळकर म्हणाले, "मला कोकणातलं सगळंच आवडलं. पहिली गोष्ट म्हणजे मी कोकणातला नाही, मी मुंबईचाच आहे. पण ज्याला हा विषय सुचला तो सुबोध खानोलकर, त्याचं आजोळ कोकणातलं. गुरु ठाकूर तो कोकणातला. तसा मी कोकणातला नाही. पण, मी कोकणात बऱ्याचदा गेलोय. नाटकाच्या दौऱ्याला म्हणा किंवा शूटिंगला म्हणा. पण आता यावेळेला 'दशावतार'च्या निमित्ताने मी जे कोकण बघितलं, ते खूप वेगळं होतं. अक्षरशः बघितलं म्हणजे त्या लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. त्या पाहून मी चकीत झालो".
पुढे ते म्हणाले, "रेकी करताना त्यांनी खूप मेहनत घेतली. परत-परत जाऊन त्यांना हव्या तशा जागा निवडल्या. इतकी घनदाट जंगलं कोकणात आहेत, हे मला माहीत नव्हतं. बऱ्याच देवराया, टेकड्या, डोंगर जंगल. जर चित्रपट बघितला तर एक खाडी आहे, मी खाडीमध्ये पोहोलोय. नदी आहे, खोल नदी आहे, उथळ नदी आहे. तिथे पाण्याखालचे सीन्स शूट केलेत, अगदी स्वच्छ पाणी होतं ते. खरं तर आमच्यामुळं ते पाणी गढुळ झालं असावंं", असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, 'दशावतार' चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह जोडीला सुनील तावडे, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, भरत जाधव, रवी काळे, विजय केंकरे, आरती वाडगबाळकर या सगळ्यांनीच त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सुबोध खानोलकर यांनी 'दशावतार' सिनेमाची कथा लिहिली असून दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.