अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) सध्या चर्चेत आहे. त्यांचा 'दशावतार' हा मराठी सिनेमा बॉक्सऑफिसवर गाजतोय. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी साकारलेली बाबुली मेस्त्रीची भूमिका लक्ष वेधून घेत आहे. या सिनेमात त्यांची आतापर्यंतची सर्वात वेगळी भूमिका आहे. दिलीप प्रभावळकरांनी याआधीही अतिशय विविधांगी भूमिका केल्या. त्यातलीच एक म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे. यात त्यांनी साकारलेली आबांची भूमिका सर्वांचीच लाडकी आहे. पण या मालिकेच्या मागची गोष्ट तुम्हाला माहितीये का? दिलीप प्रभावळकरांनी नुकताच याचा किस्सा सांगितला.
'अमुक तमुक'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेची गंमत अशी की मी 'अनुदिनी'नावाचा कॉलम एका वृत्तपत्रात येत होता. प्रत्येक रविवारी तो कॉलम जायचा. त्यात मी टिपरे हे कुटुंब तयार केलं होतं. प्रत्येक रविवारी कुटुंबातील एका सदस्याच्या डायरीतील पानं यायची. आजूबाजूला काय घडतंय त्यावर टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसातील रिअॅक्शन असं ते होतं. त्यामध्ये शेखर कुटुंबप्रमुख होता, त्याची बायको श्यामला होती. मुलगी शलाका होती आणि क्रिकेटचा वेडा शिऱ्या. शेखरचे वडील गंगाधर टिपरे हे मी डायरीतील पानं म्हणून लिहिलं होतं. लिहिताना केलेल्या त्या ५ भूमिकाच होत्या. याचीच पुढे मालिका होईल अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती."
ते पुढे म्हणाले, "मला आबा टिपरेंचं लिहिताना मजा यायची. ते जरा मिश्कील आणि असे त्रिफळा चुर्ण घेतल्याशिवाय झोप लागत नाही असे होते. शिऱ्या बरोबर मोटरसायकलवरुन बाहेर जायचा. शिऱ्याचे ते हक्काचे होते. त्यांच्या मांडीवर लोळणं, खांद्यावर हात टाकणं असं काहीही करायचा. लोकांना तो फॅमिली बॉन्ड खूप आवडायचा. तो कॉलम लोकांना खूप आवडायचा. नंतर त्याचं अनुदिनी नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. ते केदार शिंदेंच्या हाताला लागलं. त्याने त्यावर मालिका करायची ठरवली. मी त्याला म्हटलं, 'वेडा आहेस का? रोजनिशीतली पानं आहे ती यावर कशी मालिका होणार?'. त्यावर तो मला म्हणाला, 'तुमच्या लिखाणात दृश्यात्मकता आहे. या खरोखरच्या भूमिका वाटतात.' मग त्यावर मालिका करायचं ठरलं. त्याने मलाच आबांची भूमिका करायला सांगितली. मी लिहिताना तर आबाची भूमिका जगतच होतो. पण म्हटलं मी नको रे, मला वेळ नाही. पण त्याने मलाच सांगितलं आणि मग मी ती केली."