दिलीप प्रभावळकर यांचा बहुचर्चित मराठी चित्रपट 'दशावतार'ची रिलीज आधीपासूनच चांगलीच चर्चा होती. त्यामुळे चित्रपट रिलीज झाल्यावर अनेक ठिकाणी 'दशावतार' पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच चांगली गर्दी केली. त्यामुळेच पहिल्याच दिवशी 'दशावतार'ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, कमाईच्या बाबतीत 'दशावतार'ने बाजी मारली आहे
बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'ची दणक्यात सुरुवात
काल (१२ सप्टेंबर) 'दशावतार'सह 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' असे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. या तिघांमध्ये 'दशावतार'ने बाजी मारल्याचे सुरुवातीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. Sacnilk च्या आकडेवारीनुसार, 'दशावतार'ने पहिल्या दिवशी भारतात सुमारे ५८ लाख रुपयांची कमाई केली, तर चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन ६५ लाखांवर पोहोचले आहे. अशाप्रकारे पहिल्याच दिवशी 'दशावतार'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. इतकंच नव्हे चित्रपटाच्या विषयानुसार सावंतवाडी, रत्नागिरीसारख्या कोकणी भागात अनेक थिएटरमधील शो हाऊसफुल्ल झाले आहेत.
चित्रपटाबद्दल प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद
'दशावतार'च्या ट्रेलर आणि टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आधीच वाढवली होती. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेमुळे आणि कोकणातील दशावतार परंपरेवर आधारित कथेमुळे प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. 'दशावतार'बद्दल सांगायचं तर सुबोध खानोलकर यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, महेश मांजरेकर, भरत जाधव, रवी काळे, प्रियदर्शनी इंदलकर, आरती वडगबाळकर, सुनील तावडे या कलाकारांच्याही खास भूमिका आहेत.