शिवचरित्रावर सिनेमा बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता पहिल्यांदाच वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग सर्वसामान्यांना दाखवणाऱ्या संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची गोष्ट मुक्ताईच्या दृष्टीकोनातून पाहायला मिळणार आहे.
'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या सिनेमाच्या निमित्ताने दिग्पाल लांजेकर आणि टीमने एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत दिग्पाल यांना संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर दिग्पाल यांनी दिलेल्या उत्तराने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत.
काय म्हणाले दिग्पाल लांजेकर?
"माझा या सगळ्या गोष्टींवर श्रद्धा म्हणून विश्वास आहे. संप्रदायातील सगळ्या मान्यतांवर श्रद्धा म्हणून विश्वास आहे. आपण प्रत्येक ठिकाणी लॉजिक शोधायला जातो तिथेच चुकतो असं मला वाटतं. तरीसुद्धा आपण असं म्हणू शकतो की टाइम डायनामिक्स नावाची गोष्ट जगात आहे. जर आपल्याला १० वर्षांपूर्वी असं कोणी सांगितलं असतं की एखादी गाडी ड्रायव्हरशिवाय चालेल तर आपण त्यावर विश्वास ठेवला असता का? पण, तो चमत्कार आपण आज बघतोय. कदाचित ७०० वर्षांनंतर असं कोणीतरी चर्चा करायला बसलं असेल, तेव्हा ते म्हणतील की अशी गाडी कोणी कधी चालवलीच नाही, असं म्हटलेलं चालेल का? तर नाही चालणार. कारण हा टाइम डायनामिक्सचा भाग आहे. त्या काळात त्या लोकांचं ज्ञान आणि शक्ती काय होती, याचं आज तुम्ही कशा पद्धतीने विश्लेषण करताय यासाठी आपली तयारी काय आहे, हे फार महत्त्वाचं असतं. मला आपल्या तयारीवरच शंका आहे".
दरम्यान, 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमात अभिनेता तेजस बर्वे ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत आहे. संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक हिने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी केली आहे. यासोबत समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा चित्रपटात भूमिका आहेत.