गाडी घेणं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. मध्यमवर्गीय कुटुंबात गाडी खरेदी करणं हा एक आनंदाचा सोहळा असतो. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारही तळागाळातून वर आले आहेत. हे कलाकार स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आयुष्यात प्रगती करताना दिसतात. मराठी मनोरंजन विश्वातील अशाच एका अभिनेत्याने स्वतःच्या कष्टांच्या जोरावर शानदार थार गाडी विकत घेतली आहे. या अभिनेत्याचं नाव देवेंद्र गायकवाड. जाणून घ्या.
अभिनेत्याने घेतली शानदार थार
'धर्मवीर', 'देऊळ बंद' अशा सिनेमांमधून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता देवेंद्र गायकवाडने आलिशान थार गाडी विकत घेतली आहे. देवेंद्रने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत दिसतं की, देवेंद्र मुलीचा हात पकडत शोरुममध्ये प्रवेश करतो. पुढे तो कागदपत्रांवर सही करतो. त्याची मुलगी नवी गाडी घेतल्यानिमित्त केक कापते. त्यानंतर त्याची पत्नी गाडीची पूजा करते. देवेंद्र गाडीवरचा लाल कपडा बाजूला सरकवतो. त्याची मुलगी गाडीत जाऊन आनंद साजरा करते. पुढे देवेंद्र स्वतः थार चालवत ती शोरुमच्या बाहेर घेऊन येतो.
देवेंद्रने हा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलंय. देवेंद्रने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर ही महागडी आणि शानदार थार खरेदी केल्याने अनेकांनी त्याचं कौतुक केलंय. देवेंद्रच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, त्याला आपण 'सरसेनापती हंबीरराव', 'मुळशी पॅटर्न', 'धर्मवीर', 'देऊळ बंद', 'बबन', 'चौक' अशा मराठी सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. देवेंद्र हा एक 'थार'वेडा मराठी कलाकार आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये.