बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित असलेला 'दशावतार' हा मराठी सिनेमा अखेर सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. त्यामुळेच प्रदर्शित झाल्यानंतर 'दशावतार'ला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. पहिल्या दिवसापासूनच 'दशावतार'च्या शोचे थिएटर हाऊसफूल होत असल्याचं दिसत आहे. सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'दशावतार' सिनेमाने पहिल्या दिवशीच तब्बल ५८ लाख रुपये इतकी कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशीही या सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. शनिवारी 'दशावतार' सिनेमाच्या कमाईत चांगलीच वाढ झाल्याचं दिसून येत आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार 'दशावतार'ने दुसऱ्या दिवशी तब्बल १.३९ कोटींची कमाई केली आहे. तर दोनच दिवसांत या सिनेमाने १.९७ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता रविवारी हा सिनेमा कितींचा बिजनेस करेल, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकरांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमातून कोकणची लोककला दशावतारची झलक मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, रवी काळे, सुनील तावडे, आरती वाबगावकर, विजय केंकरे यांच्या मुख्य भूमिका सिनेमात आहेत. १२ सप्टेंबरला सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.