प्रत्येक ऋतूतला निसर्ग वेगळा दिसतो आणि मनाला तेवढाच भावणारा असतो. ऋतूंप्रमाणेच माणसाच्या आयुष्यातही चढ उतार येत राहतात, पण त्यात जवळचं माणूस सोबत असलं तर आयुष्याचा प्रवास आनंददायी होतो. प्रेमाची आणि आयुष्याची ऋतूंशी अशीच सांगड घालणारं प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आणि ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेलं ‘ऋतूचक्र’ हे वेगळ्या बाजाचं प्रेमगीत नुकतंच प्रदर्शित झालंय.
‘दशावतार’ या बहुचर्चित आगामी चित्रपटातलं हे गीत प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) आणि सिद्धार्थ मेनन (Siddharth Menon) यांच्या जोडीवर चित्रित करण्यात आलेलं आहे. कोकणातल्या निसर्गरम्य स्थळांवर या गीताचं चित्रीकरण करण्यात आलेलं असून न पाहिलेलं अद्भुत कोकण या गाण्यात पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर आपल्या सुमधुर आवाजामुळे आणि कोकणातील युट्यूब व्हिडिओंमुळे प्रसिद्ध असलेली स्वानंदी सरदेसाई आणि गायक साहिल कुलकर्णी यांनी हे गीत गायलं आहे.
या गाण्याबद्दल गीतकार गुरु ठाकूर म्हणतात,"प्रेम ही स्थिर भावना नसून ती काळानुसार परिस्थितीनुसार आणि नात्यातील सूक्ष्म भावनांनुसार सतत बदलत जाते. 'ऋतुचक्र' या गाण्यातून मी या बदलत्या प्रेमरंगांना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. ऋतूंच्या चक्राप्रमाणेच प्रेमाचं चक्रही नव्या अर्थांनी उमलत राहातं हे या गीताचं सार आहे."
तर संगीतकार ए.व्ही.प्रफुल्लचंद्र म्हणतात, "या गाण्याच्या स्वररचनेत कोकणातील निसर्गाची गोडी, ऋतूंची मृदुता आणि प्रेमातील कोमलता गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. साहिल आणि स्वानंदीच्या आवाजातून या भावछटा अधिक खुलून येतात. 'ऋतुचक्र' हे प्रेमगीत निसर्ग आणि प्रेम यांचा सुसंवादी संगम आहे."
झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ हा दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे यासारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका असलेला चित्रपट येत्या १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.