Dashavatar Total Collection: गेल्या काही दिवसात मनोरंजनविश्वात फक्त मराठी सिनेमांचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. १२ सप्टेंबर रोजी एकूण तीन मराठी चित्रपट रिलीज झाले. त्यातला 'दशावतार' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पहिल्याच दिवशी ५८ लाखांची कमाई करणाऱ्या 'दशावतार'ने दहाव्या दिवशी डरकाळीच फोडली आहे. रविवार असल्याने प्रेक्षकांनी सिनेमाला तुडुंब प्रतिसाद दिला आहे. किती झाली कमाई?
दहा दिवसात कमावले 'इतके' कोटी
सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चा थाट दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रेक्षकांना सिनेमा प्रचंड आवडला असून मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटीही होत आहे. ८१ वर्षीय दिलीप प्रभावळकरांचा बाबुली मेस्त्री प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दहाव्या दिवशी म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने सिनेमाने तब्बल ३ कोटी कमावले आहेत. तर शनिवारपर्यंत कमाईचा एकूण आकडा १२.८५ कोटी इतका होता. म्हणजेच दहा दिवसात सिनेमाने १५.८५ कोटींचा बिझनेस केला आहे. यापुढेही सिनेमा झपाट्याने कलेक्शन करेल असा अंदाज आहे.
'दशावतार' सिनेमाचं तगडं प्रमोशन झालं. मुंबई, पुणे, गोवा इथे प्रीमियरही आयोजित करण्यात आला. तसंच सिनेमातील कलाकार अजूनही थिएटरमध्ये भेटी देत आहेत. यामुळे प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढत आहे. कोकणच्या मातीची, दशावताराची ही कथा आणि यातून मिळणारा बोध महत्वाचा आहे. दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाला तर तोडच नाहीये. शिवाय सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, सुनील तावडे, अभिनय बेर्डे यांनीही चोख काम केलं आहे. सुबोध खानोलकर यांनीच सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. तर १० जणांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.