Join us

"मराठीसारखं काम करु नका यार", हिंदी दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून छाया कदमने शूटिंगच थांबवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 13:00 IST

कधी कधी आपल्यात हे बोलण्याची ताकद येते...

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री छाया कदम(Chhaya Kadam). 'सैराट','फँड्री' सारख्या सिनेमांमधील छोट्या पण दर्जेदार भूमिकांमधून ती पुढे आली. गेल्या वर्षी आलेल्या किरण रावच्या 'लापता लेडीज'मधील भूमिकेने सर्वांचं मन जिंकलं. इतकंच नाही तर तिने सलग दोन वर्ष कान्स फिल्म फेस्टिव्हललाही हजेरी लावली. तिच्या 'ऑल वी इमॅनज अॅज लाईट' या सिनेमाचं स्क्रीनिंग कान्समध्ये झालं होतं. तर पुढच्या वर्षी तिने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेल्या 'स्नो फ्लॉवर' या मराठी सिनेमासाठी तिने हजेरी लावली होती. अशा मराठमोळ्या छायाने आपल्या अभिनय कौशल्याने सातासमुद्रापार झेंडा रोवला. नुकतंच तिने मराठी इंडस्ट्रीत काम करताना हिंदी दिग्दर्शकाकडून आलेल्या अनुभवाचा किस्सा सांगितला.

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत छाया कदम म्हणाली,  "एका सिनेमाच्या सेटवर जो दिग्दर्शक होता तो दिल्लीचा होता. शूटिंगवेळी तो दोन-तीन वेळा माझ्यासमोर बोलत होता की, 'यार वो मराठी जैसा काम नही करने का, अरे यार वो मराठी अॅक्टर जैसा नही करना है'. मग एक वेळ अशी आली की मला राग आला. माझ्यातली मालवणी, कबड्डी खेळणारी मुलगी जागी झाली. माझं असं झालं की, 'अरे मग का करतोय तू मराठी सिनेमा? हिंदीत तुला कोणी विचारलं नाही म्हणून तू इकडे आला.' माझ्यासमोर दुसऱ्या एका अभिनेत्रीलाही तो हेच सांगत होता. मी शेवटी शूटिंगच थांबवलं. मी विचारलं, 'ये आप क्या बोल रहे हो? मला वाद घालायचा नाही. तू आधी माफी माग. आणि तू जिला बोलतोयस ती मराठीतली मोठं नाव असलेली अभिनेत्री आहे."

ती पुढे म्हणाली, "मग वातावरण थोडं तंग झालं. कधी कधी आपल्यात हे बोलण्याची ताकद येते. मी आयुष्यात माणसं कमवली आहेत. त्यामुळे या सेटवर मी जर बोलले की शूटिंग थांबवा तर माझं सगळे ऐकणारेच आहेत हे मला माहित होतं. कारण स्पॉटची मुलं, लाईटमन, मेकअप टीम सगळेच माझे ओळखीचे आहेत. मी त्यांची ताई आहे आणि ते माझे भाईलोग आहेत. मी सांगितलं तर शूटिंग थांबणार हे मला माहित होतं. मी शूट थांबवलं. शेवटी मग दिग्दर्शकाने माफी मागितली आणि मग काम करायला सुरुवात झाली."

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपट