Join us

बॉलिवूडची ही अभिनेत्री करतेय मराठीत पदार्पण, अतुल आणि तेजश्री प्राधनसोबत दिसणार सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 14:23 IST

सिनेसृष्टीच्या उगमापासूनच मराठमोळ्या कलाकारांनी भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे.

सिनेसृष्टीच्या उगमापासूनच मराठमोळ्या कलाकारांनी भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळेच सिनेसृष्टीच्या उगमापासूनच भारतीय चित्रपटसृष्टीत मराठमोळ्या कलाकारांना मानाचं स्थान मिळत आलं आहे. याचीच प्रचिती प्रेक्षकांना पुन्हा एकदा येणार आहे. ‘अन्य’ हा सिनेमा मराठीसह हिंदी भाषेतही बनणार आहे.

‘इनिशिएटिव्ह फिल्म्स’च्या बॅनरखाली ‘कॅपिटलवुड्स पिक्चर्स’च्या सहयोगाने ‘अन्य’ची निर्मिती करण्यात आली आहे. सिम्मी जोसेफ हे दाक्षिणात्य दिग्दर्शक या चित्रपटाद्वारे मराठीसह हिंदीमध्ये पदार्पण करीत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे मराठमोळे कलाकार ही ‘अन्य’ची खासियत असल्याचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अतुल कुलकर्णा आणि प्रथमेश परब या मराठीसोबतच हिंदीतही यशस्वी कारकिर्द घडवणा-या दोन मराठमोळ्या अभिनेत्यांच्या जोडीला भूषण प्रधानही ‘अन्य’मध्ये मध्यवर्ता भूमिकेत झळकणार आहे. यासोबतच मराठी मालिका, नाटक आणि सिनेमाद्वारे लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधानही या चित्रपटात आहे. या मराठमोळ्या कलाकारांच्या जोडीला हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रायमा सेनचं दर्शन या चित्रपटात घडणार आहे. कृतिका देव आणि सुनील तावडे या मराठी कलाकारांच्या जोडीला गोविंद नामदेव आणि यशपाल शर्मा हे महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

 या सिनेमाचं कथानक मानव तस्करीवर आधारित आहे. एका डॉक्युमेंट्रीच्या दृष्टिकोनातून समाजात घडणा-या वास्तववादी घटनांचा वेध घेत एक भयाण सत्य मांडण्याचा प्रयत्न ‘अन्य’च्या माध्यमातून करण्यात आला आहे. दिग्दर्शनासोबतच सिम्मी यांनीच या चित्रपटाची कथा-पटकथा लिहीली आहे. जेएनयूमध्ये पीएचडी पूर्ण केलेल्या सिम्मी यांनी ‘द आर्ट ऑफ सत्याग्रह अँड द मसीहाज’ या पुस्तकाचं लेखनही केलं आहे. त्यामुळे लेखनाचा तगडा अनुभव असणा-या सिम्मी यांच्या दिग्दर्शनाची जादू प्रेक्षकांना ‘अन्य’मध्ये अनुभवायला मिळणार आहे. महेंद्र पाटील यांनी परिस्थिती आणि प्रसंगानुरूप मराठी सिनेमाचं अर्थपूर्ण संवादलेखन केलं आहे.

सिनेमॅटोग्राफर साजन कालाथील यांनी या सिनेमाचं छायांकन केलं आहे. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार विपीन पाटवा यांच्यासह रामनाथन, रिषी एस्., आणि कृष्णाराज यांनी या सिनेमातील गीतांना संगीत दिलं असून, रोहित कुलकर्णा यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. डॉ. सागर आणि संजीव सारथी यांनी हिंदी गीते लिहिली असून प्रशांत जामदार यांनी मराठी गीतांची सांभाळली आहे. प्रॉडक्शन डिझाईन शेखर उज्जयीनवाल यांनी केलं असून असोसिएट दिग्दर्शकाची बाजू नंदू आचरेकर, रॉबिन आणि राजू यांनी सांभाळली आहे. कोरिओग्राफी साभा मयूरी यांनी केली आहे, तर निलम शेटये यांनी कॉस्च्युम डिझाईन केलं आहे. थनुज यांनी संकलनाची बाजू सांभाळली आहे. या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून सध्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम वेगात सुरू आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात ‘अन्य’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

टॅग्स :तेजश्री प्रधान अतुल कुलकर्णी