मराठी अभिनेता भूषण प्रधान एका फोटोमुळे चर्चेत आला होता. अभिनेत्री केतकी नारायणसोबत मॅटर्निटी फोटोशूटमुळे चर्चा रंगल्या होत्या. अखेर या फोटोमागचं गुपित आता उलगडलं आहे. भूषण खऱ्या आयुष्यात नव्हे तर ऑनस्क्रीन पालक झाला आहे. त्याचा नवा सिनेमा 'तू माझा किनारा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात भूषण वडिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
पोस्टरमध्ये दिसणारं केतकी, भूषण आणि केया यांचं हसतमुख क्षणचित्र पहिल्या नजरेला आनंदाचं वाटतं. पण त्या नजरेमागे नात्यांची एक वेगळी छटा दडलेली आहे. जी प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते. 'तू माझा किनारा' हा केवळ कुटुंबकेंद्री सिनेमा नाही, तर प्रत्येक घरात घडणाऱ्या भावनिक प्रवासाचा आरसा आहे.
या चित्रपटाची निर्मिती जॉइसी पॉल जॉय यांनी केली असून, सह-निर्माते सिबी जोसेफ आणि जॅकब जेव्हियर आहेत. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन क्रिस्टस स्टीफन यांचे असून, त्यांनी कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत संवेदनशीलतेने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. रूपांतरित पटकथा आणि संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. छायांकन एल्धो आयझॅक यांचे असून कथानकाला वास्तववादी स्पर्श देण्याचं मोठं काम त्यांच्या कॅमेऱ्याने केलं आहे. संकलन सुबोध नारकर यांनी केले असून अनिल केदार यांनी कला दिग्दर्शन केले आहे.
'तू माझा किनारा' हा भावनिक प्रवास ३१ ऑक्टोबर रोजी सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. चित्रपटात मुक्ताच्या भूमिकेत सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम स्टार केया इंगळे असून भूषण प्रधान आणि केतकी नारायण यांची पात्र अजून उलगडली गेली नाहीत. पोस्टर पाहून प्रेक्षकांना लगेच जाणवतं की हा चित्रपट केवळ एका कुटुंबाची कथा नाही, तर प्रत्येक घरातल्या नात्यांचा आरसा आहे. कधी आनंद, कधी ओझं, कधी हसू आणि कधी आसवं या सर्व भावनांचा किनारा प्रेक्षकांना या चित्रपटात सापडेल.