Join us

"बाळासाहेब ठाकरेंना मी शिवसेनेत हवा होतो...", महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा, म्हणाले- "माझा एक पाय मातोश्रीत आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 16:18 IST

बाळासाहेब ठाकरेंनी मला शिवसेना प्रवेशाची ऑफर दिली होती, असा खुलासा महेश मांजरेकर यांनी केला आहे. एकदा वाचावाच असा किस्सा

महेश मांजरेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. महेश मांजरेकरांना आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंच आहे शिवाय त्यांनी हिंदी-मराठी सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. महेश मांजरेकरांचे राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींशी घनिष्ट संबंध आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंशी महेश यांची चांगली मैत्री आहे. अशातच एका मुलाखतीत, मला बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती, असा मोठा खुलासा महेश यांनी केला. काय घडलं होतं नेमकं?

बाळासाहेब ठाकरे महेश मांजरेकर यांना काय म्हणाले?

झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत महेश यांना राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयी काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा महेश मांजरेकर म्हणाले, ''मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बाळासाहेबांना मी खूप आवडायचो. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय त्यांनी कमीतकमी ७० वेळा बघितला असेल, असं मला वाटतं. मी कधी त्यांच्या घरी गेलो की मला DVD प्लेअर दाखवायचे. मला एकदा त्यांनी रात्री घरी बोलावलं. ते मला म्हणाले - मला तू शिवसेनेत हवास. मी घाबरलोच. विक्रोळीत त्यांची सभा होती वाटतं, तिथे तू हवायस, असं मला ते म्हणाले.''

''माझे पाय लटलट कापायला लागले. मी त्यांना म्हटलं- नाही ओ! मी राज ठाकरेचा मित्र आहे. मी तिथून निघालो, बाहेर आलो आणि मला राज ठाकरेंचा मोबाईलवर फोन आला. माझा एक पाय मातोश्रीच्या बाहेर होता. काही माणसं सोबत होती म्हणून त्यावेळी मला फोन घेता आला नाही. मी ठरवलं की, राज माझा मित्रच आहे. कसा जाईन मी? मी काही नाही केलं. घरी आलो. तीन दिवस फोन बंद केला आणि झोपलो.'' अशाप्रकारे महेश मांजरेकर यांनी हा किस्सा सांगितला. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय', हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Balasaheb Thackeray wanted me in Shiv Sena: Mahesh Manjrekar

Web Summary : Mahesh Manjrekar revealed Balasaheb Thackeray offered him a Shiv Sena position. Manjrekar, close to Raj Thackeray, declined, citing their friendship. He recounted the surprising offer and his conflicted reaction.
टॅग्स :महेश मांजरेकर बाळासाहेब ठाकरेशिवसेनाउद्धव ठाकरेराज ठाकरे