Join us

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:44 IST

समीर वानखेडे यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Kranti Redkar Reply To Aryan Khan And Trollers: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' (The Ba***ds of Bollywood) या वेब सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. ही सीरिज सध्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली असून, त्यातील एक सीन जोरदार व्हायरल होत आहे.  या सीनमध्ये आर्यनने ड्रग्ज प्रकरणात त्याला अटक करणाऱ्या तत्कालीन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांची विंडंबना केल्याचं दिसलं. 

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' च्या पहिल्या भागात एक पात्र समीर वानखेडे यांच्यासारखेच दिसते. हे पात्र पोलीस व्हॅन घेऊन एका पार्टीवर छापा टाकते आणि 'सत्यमेव जयते'चा जयघोष करते. आर्यन खानला अटक झाल्यावर वानखेडे अनेकदा हाच नारा देत होते, त्यामुळे युजर्स या पात्राची तुलना थेट त्यांच्याशी करत आहेत. या व्हिडिओवर जोरदार ट्रोलिंग सुरू झाल्यानंतर, समीर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर  (Marathi Actress Kranti Redkar) हिने एक व्हिडिओ शेअर करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 क्रांतीने एक 'रियल ट्रान्झिशन' व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात लहानपणीच पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे बाल समीर वानखेडे आणि त्यानंतरचे त्यांचे पोलीस अधिकारी झाल्यावरचा फोटो दिसत आहेत. या व्हिडिओला तिने "तुम जलन बरकरार रखना हम जलवे बरकरार रखेंगे" हे गाणे जोडले आहे.

कॅप्शनमध्ये क्रांतीने लिहिले, "जेव्हा तुम्हाला एवढ्या लहानपणीच कळतं की तुम्हाला काय व्हायचं आहे, तेव्हा ते फक्त एक काम नसतं, ती तुमची आवड (जिद्द/पॅशन) असते", असे म्हणत तिने पतीच्या कामाचे कौतुक केले आहे.

नेमकं काय घडलं होतं?ऑक्टोबर २०२१ मध्ये समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एनसीबी टीमने मुंबईजवळ एका क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. या प्रकरणात आर्यन खानवर ड्रग्स खरेदी-विक्री आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कशी संबंध असल्याचा आरोप होता. आर्यनने २५ दिवस तुरुंगात घालवले, पण नंतर पुराव्याअभावी त्याला जामीन मिळाला. यानंतर वानखेडे यांच्यावर लाच घेतल्याचा आरोपही लावण्यात आला होता. हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले होते आणि आता आर्यनने त्याच्या वेब सीरिजमध्ये याचा संदर्भ दिल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :क्रांती रेडकरआर्यन खानसमीर वानखेडेशाहरुख खान