आर्यन खानची बहुचर्चित वेबसीरिज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' रिलीज झाली. या वेबसीरिजमध्ये आर्यन खानने बॉलिवूडची काळी बाजू समोर आणली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या आयुष्याची आर्यनने पोलखोल केली आहे. अशातच 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील एका प्रसंगाची चांगलीच चर्चा रंगली. तो प्रसंग म्हणजे आर्यन खानने NCB अधिकारी समीर वानखेडेंची खिल्ली उडवली. अखेर यावर समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने निशाणा साधला आहे. काय म्हणाली क्रांती?
क्रांती रेडकर काय म्हणाली?अभिनेत्री क्रांती रेडकरने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत समीर वानखेडे ड्रग्जविरोधी मोहिमेविषयीच्या एका कार्यक्रमात सहभागी असलेले दिसतात. यावेळी ते उपस्थित लोकांना ड्रग्ज किती वाईट आहे आणि आयुष्याला हानीकारक आहे, याविषयी सांगत असतात. या व्हिडीओखाली क्रांती म्हणाली, ''अमली पदार्थांचे व्यसन ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याची खिल्ली उडवणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे हे खूप धोकादायक आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने या समस्येचे गांभीर्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात होणारे मोठे दुष्परिणाम टाळता येतील.'' अशा शब्दात क्रांतीने कॅप्शन लिहून समीर वानखेडेंच्या कामाचं कौतुक केलं आहे.
एकूणच क्रांतीने नाव न घेता 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजमध्ये समीर वानखेडे आणि त्यांनी आर्यन खानवर केलेल्या कारवाईची जी खिल्ली उडवली त्यावर निशाणा साधला आहे. अनेकांनी याविषयी क्रांतीला सपोर्ट केला आहे. याशिवाय समीर वानखेडे ड्रग्जविरोधी जी कारवाई करत आहेत, त्याला सपोर्ट केला आहे.
आर्यन खानच्या वेबसीरिजमध्ये दिसतं की, समीर वानखेडेंसारखा अधिकारी एका सेलिब्रिटीला तो नशा करतोय म्हणून गाडीत डांबतो. या एपिसोडच्या शेवटी say no to drugs असा संदेश वेगळ्या पद्धतीने देण्यात येतो. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या पहिल्याच एपिसोडमध्ये अधिकारी समीर वानखेडेंची मस्करी करण्यात आली, अशी चर्चा रंगली. सीरिजमध्ये ज्या अभिनेत्याने ही भूमिका साकारली आहे त्याचा चेहरा आणि लूक समीर वानखेडेंशी मिळताजुळता आहे. या अभिनेत्याने केलेला अभिनय हा समीर वानखेडेंचं विडंबन केलंय, अशा पद्धतीचा दिसतो.