Join us

प्रेम असं करावं! सुखी संसाराची २९ वर्षे, अविनाश नारकरांनी पत्नीच्या केसात माळला गजरा, ऐश्वर्या यांनी शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:42 IST

Couple Goals! लग्नाचा २९वा वाढदिवस, ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

ऐश्वर्या नारकर-अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक वर्ष ते दोघेही प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. ऐश्वर्या आणि अविनाथ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मंगळवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. यानिमित्ताने त्यांनी खास व्हिडिओ शेअर केला आहे. 

ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या लग्नाला २९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या दोघांनी मिळून सहजीवनाच्या आणि सहवासाच्या या २९ वर्षांचं खास सेलिब्रेशन केलं. याचा व्हिडिओ ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत ऐश्वर्या आणि अविनाश केक कापून लग्नाचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. त्यानंतर अविनाश ऐश्वर्या यांच्या केसांत गजरा माळून त्यांचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. या व्हिडिओला ऐश्वर्या यांनी खास कॅप्शनही दिलं आहे. 

"काल खूप मोठा दिवस होता. एकमेकांसोबत २९ वर्ष पूर्ण केली. अजून खूप वर्ष एकत्र घालवायची आहेत. मला तुमच्याबरोबर पूर्ण झाल्यासारखं वाटतं. माझ्यासोबत असेच कायम राहा. तुमचं प्रेम, काळजी, पाठिंबा...लव्ह यू", असं कॅप्शन ऐश्वर्या यांनी या व्हिडिओला दिलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत लग्नाच्या वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

ऐश्वर्या आणि अविनाश यांनी १९९५ साली लग्नगाठ बांधली होती. सिनेसृष्टीतील ते आदर्श कपल आहेत. ते दोघे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. अनेक रील व्हिडिओ ते शेअर करताना दिसतात. त्यांच्या व्हिडिओला चाहत्यांकडून तुफान प्रतिसादही मिळतो. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरअविनाश नारकरमराठी अभिनेता