Join us

"संतोषचं वक्तव्य हास्यास्पदच पण...", मित्रासाठी धावून आला अवधूत गुप्ते, ट्रोलर्सला सुनावलं

By कोमल खांबे | Updated: March 25, 2025 13:03 IST

"संतोषने थोडं जास्त श्रेय घ्यायचा प्रयत्न केला म्हणून...", अवधूत गुप्तेचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

'छावा' सिनेमामुळे संतोष जुवेकर चर्चेत आहे. या सिनेमात त्याने साकारलेल्या रायाजी मालगे या भूमिकेसाठी त्याचं सर्वत्र कौतुकही झालं. मात्र छावा सिनेमात औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संतोष जुवेकरला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्याच्यावरील मीम्स अजूनही व्हायरल होत आहेत. संतोष जुवेकरने स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्याला ट्रोल केलं जात आहे. यावर आता सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेने भली मोठी पोस्ट लिहित संतोषला पाठिंबा दर्शविला आहे. 

संतोषचा जिगरी यार असलेल्या अवधूत गुप्तने त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने ट्रोर्सला सुनावत त्यांची कानउघाडणी केली आहे. याबरोबरच त्याने संतोषचा सिनेसृष्टीचा प्रवासही यातून सांगितला आहे. 

अवधूत गुप्तेची पोस्ट 

मित्रांनो! सर्वप्रथम माझा मित्र संतोष जुवेकर ह्याचे ‘छावा‘ ह्या चित्रपटातील काम बघून तुम्ही जी त्याची स्तुती केलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद!! आता.. गेल्या दोन आठवड्यांपासून त्याला जे ट्रोल करता आहात त्याबद्दल थोडसं.. "अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत असल्यामुळे मला त्याच्याशी बोलावसंच वाटलं नाही" हे त्याचं वक्तव्य कुणालातरी खरोखरच हास्यास्पद वाटू शकतं. पण, त्यावर हसण्याआधी जरा संतोषच्या आधीच्या कारकिर्दीकडे बघणं गरजेचं आहे.

संतोष जुवेकरचं केलं कौतुक

‘झेंडा‘च्या वेळेस ‘संत्या‘च्या भूमिकेच्या मुळातच खूप जवळ असलेला संतोष, केवळ अजून त्यात शिरता यावं म्हणून संपूर्ण चित्रिकरणादरम्यान त्या चाळीतच राहिला होता. ‘मोरया‘च्या वेळेस देखील तसंच. ‘एकतारा‘ हा चित्रपट गायकाच्या आयुष्यावर आधारित. त्या भूमिकेसाठी संतोष साधारणपणे वर्षभर गायन आणि गिटार वाजवणे शिकत होता. त्या वर्षातल्या माझ्या जवळपास सर्व कार्यक्रमांना केवळ ऑब्जर्व करण्यासाठी तो माझ्याबरोबर फिरत होता. हे माझ्या सोबतच्या चित्रपटांचे झाले. परंतु, इतर दिग्दर्शकांबरोबर इतर चित्रपटांसाठी देखील काम करताना, भूमिकेसाठी तितकाच वेडेपणा त्याने केलेला मी फार जवळून बघितलेला आहे. आता हीच जर त्याची ‘मेथड‘ असेल तर ती आपण सर्वांनी एक्सेप्ट करायलाच हवी.. कारण ‘रिझल्ट‘ आपण बघितलेला आहे आणि तो निर्विवाद आहे!

अभिनयाच्या ह्याच वेडापाई संतोष आजही एकटा राहतो. अर्थात, एकटा राहत असून सुद्धा त्याच्या एकट्याचा संसार हा दृष्ट लागण्यासारखा आहे! त्याचं घर कधीही जाऊन बघा.. एखाद्या गृहिणीला लाजवेल असं टापटीप असतं! त्यातच, तो जवळ रहाणाऱ्या स्वतःच्या आई-वडिलांची, अधिक पुतणीची काळजी देखील घेतो. कुठल्याही मराठी अभिनेत्याच्या नशिबी असलेली दुर्दैवी काटकसर त्याच्याही नशिबी आहे. परंतु, आजवर संतोषने कुणाचे पैसे बुडवल्याची किंवा नको ती देणी करून ठेवल्याची तक्रार आजवर कधीही ऐकलेली नाही.

अशा सोन्यासारख्या माणसाने आणि हाडाच्या अभिनेत्याने एखाद्या चित्रपटानंतर थोडे जास्त श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याची खिल्ली उडवली गेली. पण सहाराच्या वाळवंटामध्ये भर उन्हात पळत राहावे आणि सतत पाणी म्हणून जे भासते, त्याच्या जवळ गेल्यावर ते मृगजळ निघावे.. असा प्रवास केलेल्या माणसाला खरोखर जर एखादा चवदार पाण्याचा तलाव मिळाला तर.. त्याचे वेड्यासारखे नाचणे हे हास्यास्पद म्हणावे की केविलवाणे?

ही शोकांतिका केवळ संतोष जुवेकरचीच नव्हे तर मराठीतल्या अनेक कलावंतांची आहे. वर्ष भर मेहनत करून एका शुक्रवारी चित्रपट येतो आणि शनिवारी एखादा मित्र किंवा फॅन त्याला विचारतो की "बाकी.. नवीन काय करतोयस?" त्यावेळेसचे त्या कलाकाराचे दुःख मीम करणाऱ्याला कधीच कळणार नाही. कारण दगडावर उमलू पाहणाऱ्या फुलाचा संघर्ष कबरी वरच्या बुरशीला कसा कळणार?

अवधूत गुप्तेने ट्रोलर्सला सुनावलं!

त्यातून, ज्या काही लोकांनी पहिली मीम केली त्यांचं खरोखरीच कौतुक आहे कारण त्यांनी प्रवाहच्याविरुद्ध, अर्थात सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाच्या अभिनेत्याविरुद्ध विधान करण्याचे धाडस दाखवले. संतोषने देखील त्याबाबत कुठेही तक्रार न नोंदवता खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन केले. पण त्यानंतर वडाच्या झाडावर उगवलेल्या बाकीच्या पिंपळाच्या वेलींनी आता थांबायला हवं.

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत एका अमराठी अभिनेत्याचा खुल्या दिलानं स्विकार करून तुम्ही तुमचं मोठं मन दाखवून दिलं आहे. आता आजूबाजूच्या मराठी अभिनेत्यांचे कौतुक करण्याची वेळ आली आहे. तिथे कमी पडून कमावलेलं घालवू नका कुटुंबातील सोहळा आहे. एखादा कुटुंबीय विचित्र नाचला. त्याला चिडवून झालं! आता पुरे! आता त्याला जवळ घ्या. एवढंच!

 

टॅग्स :संतोष जुवेकर'छावा' चित्रपटअवधुत गुप्ते मराठी अभिनेता