गायक, संगीतकार अवधूत गुप्तेची (Avadhoot Gupte) पोस्ट चर्चेत याहे. अवधूत गुप्ते मुंबईतील बोरिवरी पूर्व येथे राहतो. अनेकदा त्यांच्या भागात माकडांचा खूप वावर असतो. त्याने याआधीही तसे व्हिडिओही दाखवले होते. बोरिवलीला लागूनच संजय गांधी नॅशनल पार्क असल्याने रहिवाशी एरियात बिबट्या सुद्धा आला आहे. तर आता चक्क भलामोठा, जाडजूड अजगरही अवधूत राहतो त्या सोसायटीजवळ निघाला. सोसायटीतील लोकांनी सर्पमित्राला बोलवून त्याला पकडले आणि सुरखरुप जंगलात सोडले. अवधूतने संपूर्ण घटनेवर पोस्ट शेअर केली आहे.
अवधूत गुप्तेने अजगराचा खतरनाक फोटो पोस्ट केला आहे. तसंच अजगराला घेऊन जातानाचा व्हिडिओही दाखवला आहे. यासोबत त्याने लिहिले, "मुंबईतल्या घरांमध्ये भिंतीवर ‘पाल‘ दिसली तरी शेजार पाजाऱ्यांना बोलवून “ऐऽऽ!! ऊऽऽ!!”चा दंगा करणाऱ्यांनी आमच्या बोरिवलीच्या श्रीकृष्ण नगर परिसरामध्ये गेल्या दोन दिवसात मिळालेले हे दोन अजगर नक्की पहावेत! माकडांबरोबर तर आमचे सहजीवनच. परंतु, कधी बिबट्या तर कधी अजगरासारखा पाहुणा आमच्या कॉलनीमध्ये आला की कृष्णनगरवासियांचा उत्साह हा अक्षरशः सण-सोहळ्यासारखा असतो! अर्थात आमच्यावर संस्कारच निसर्ग प्रेमाचे. ते आमच्या घरात येत नसून, आम्हीच त्यांच्या घरात घर बांधले आहे ह्याची जाणीव प्रत्येक नगरवासीयाला कायम असते. त्यामुळे ह्या दोन अजगरांना देखील सर्पप्रेमींच्या मदतीने त्यांच्या इष्ट स्थळी पुनश्च पोहोचवण्यात आले."
"ही पोस्ट कुठल्याही वन अधिकाऱ्याने किंवा वनविभागाने कुठलीही कारवाई करावी यासाठी नसून, आमच्या कृष्णनगराचे कौतुक करण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे कृष्णनगर आणि आजूबाजूच्या परिसरात नव्याने विस्थापित होणाऱ्या नव्या शेजाऱ्यांचे स्वागत करत असतानाच त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी आहे. जय श्री कृष्ण नगर!! जय बोरिवली पूर्व!!"