Join us

"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 09:51 IST

केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी नाव कमावलं. पण, हिंदीत कायमच दुय्यम भूमिका त्यांच्या वाट्याला आली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यामागचं कारण त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ हे सगळ्यांचेच लाडके मामा आहेत. गेली कित्येक वर्ष त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. एक सो एक भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. कधी विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना हसवलं तर कधी तितकीच गंभीर भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांना विचार करायला भागही पाडलं. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी नाव कमावलं. पण, हिंदीत कायमच दुय्यम भूमिका त्यांच्या वाट्याला आली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यामागचं कारण त्यांनी सांगितलं. 

'करण अर्जुन', 'कोयला', 'जोरू का गुलाम', 'सिंघम', 'प्यार किया तो डरना क्या', 'गुप्त' अशा हिंदी सिनेमांमध्ये अशोक सराफ दिसले. मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या या नटाच्या वाट्याला बॉलिवूडमध्ये हिरोची भूमिका आली नाही. हिंदी सिनेमात हिरोच्या भूमिकेत ते का दिसले नाहीत, यामागचं कारण अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी सांगितलं.  

काय म्हणाले अशोक सराफ?

"मराठी लोकांची इमेज ही हिंदीत बसत नाही. त्यांच्या दृष्टीने हिरो म्हणजे गोरा पान...तो काम काय करतो हे कोणाला माहीत नसतं. आणि कोणाला कळतंही नाही. तसे तर आपण दिसत नाही. त्यामुळे आपल्याला हिरोचे रोल कधी मिळणार नाही. मग आपण कॅरेक्टर शोधतो. माझ्यासारख्या किंवा लक्ष्मीकांत सारख्या चेहऱ्याला मग नोकराची भूमिका मिळते. त्याशिवाय काही मिळतच नाही. आता ते करायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं. जर तुम्हाला ते चांगले पैसे देत असतील आणि जर तुमचा फायदा होत असेल तर काहीच हरकत नाही. पण, लोक काय म्हणतात यात अर्थ नाही. तिथे आम्ही हिरो म्हणून काम करणं हे होऊच शकत नाही. मग आम्ही कशाला हट्ट धरायचा". 

भोजपुरीत मिळालं बेस्ट अॅक्टर

"तुम्हाला जर वेळ असेल तर काम करा. मी हिंदीत जेव्हा मला वेळ असेल फक्त तेव्हाच काम केलंय. एक भोजपुरी प्रोड्युसर आला होता. मी कधी भोजपुरी केलेलं नाही. एक भूमिका होती. मी त्याला म्हटलं माझ्याकडे वेळ नाही. या १५ दिवसांत होत असेल तर बघ. तो म्हणाला हो चालेल. मी परफेक्ट त्यांची भाषा बोललोय. त्यांचा लेहेजा पकडला की तुम्ही भोजपुरी बोलू शकता. मला भोजपुरीचं त्या वर्षीच बेस्ट अॅक्टर अवॉर्ड मिळालं. माझी जी भाषाच नाही त्या भाषेत मला अवॉर्ड मिळालं". 

टॅग्स :अशोक सराफमराठी अभिनेता