Join us

अशोक सराफ यांचा झाला होता भीषण अपघात, गाडीचा झालेला चक्काचूर, म्हणाले- "माझ्या अंगातून रक्ताचा..."

By कोमल खांबे | Updated: February 25, 2025 17:43 IST

अशोक सराफ यांचा झाला होता भीषण अपघात, गाडीचा झालेला चक्काचूर, मरणाच्या दारातून परतले

कॉमेडीचा बादशहा अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते. अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाने एक काळ अजरामर केला. आजही त्यांचे कित्येक जुने सिनेमे चाहते आवर्जुन पाहतात. त्यांच्या कलाविश्वातील कारकीर्दीसाठी अशोक सराफ यांना पद्मश्री हा सर्वोच्च पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांनी नुकतीच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये हजेरी लावली होती.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी त्यांच्या कारकीर्दीतील अनेक किस्से सांगितले. एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातातून ते थोडक्यात बचावले होते. याबाबत त्यांनी मुलाखतीत भाष्य केलं. 

शूटिंगला जात असताना कारचा अपघात

"मी तीन दिवसांपासून दिवस-रात्र शूटिंग करत होतो. त्यावेळी मी एका हिंदी प्रोजेक्टचं शूटिंग करत होतो. त्यानंतर मला कोल्हापूरला जायचं होतं. माझ्या दुसऱ्या एका सिनेमाचा मुहुर्त होता. तो प्रोड्युसर मला म्हणाला की हा सेट पुन्हा लागणार नाही. तुमचा एक सीन बाकी आहे. तो शूट करा आणि तुम्ही जा. मी त्यांना म्हटलं की मला सकाळी कोल्हापूरला पोहोचायचं आहे. तर ते म्हणाले की तुम्ही ट्रेनने नका जाऊ मी हवं तर तुम्हाला कार देतो". 

मरणाच्या दारातून परतले अशोक सराफ

"मी कारने कोल्हापूरला जात असताना पुण्याजवळ अपघात झाला. त्या अपघतात गाडीचा चक्काचूर झाला होता. पण, माझ्या अंगातून रक्ताचा थेंबही निघाला नव्हता. वेगाने गाडी ट्रकवर आदळली होती. त्या अपघातात गाडीचा दरवाजा उघडून मी सीटसहित बाहेर फेकलो गेलो. अनेक जण तिथून गेले पण कोणीही मला ओळखलं नाही. एका बंगाली माणसाने मला ओळखलं. तेव्हा लोकांनी मला उचललं आणि एसटीमध्ये बसवलं. माझ्या मानेला फ्रॅक्चर झालं होतं. पुण्यातील ससून रुग्णालयात मला दाखल केलं होतं. पण, पोलीस केस असल्यामुळे कोणीही लक्ष देत नव्हतं. एका पंजाबी बाईने मला तिथे ओळखलं. तिने पुणे गेस्ट हाऊसमध्ये फोन लावला आणि सांगितलं. तेव्हा अजय सरपोतदार आला आणि त्याने मला दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं. म्हणून मी वाचलो. तीन दिवस मी बेशुद्ध होतो. या संपूर्ण प्रसंगानंतर मी स्वामी समर्थांचा भक्त झालो". 

टॅग्स :अशोक सराफमराठी अभिनेतासेलिब्रिटी