Join us

Birthday Special : अशोक सराफ यांचा मुलगा अभिनयात नव्हे तर या कलेत आहे पारंगत, आई-वडिलांप्रमाणेच आहे प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 12:27 IST

अनिकेत काही वेळा त्याच्या आई वडिलांसोबत कार्यक्रमांना हजेरी नक्कीच लावतो. पण अभिनय क्षेत्रात करियर करण्यात त्याला काहीही रस नाहीये.

ठळक मुद्देअनिकेत खूप चांगला शेफ असून तो पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबला निक सराफ या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत.

तुमचे आमचे आवडते अशोक मामा आणि मराठी चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. पडद्यावर विविधांगी भूमिका साकारणारे, प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अशोक सराफ रिअल लाईफमध्ये अतिशय शांत स्वभावाचे आहेत.

अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांना मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हटले जाते. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी वयाची सत्तरी पार केली असली तरी आजही ते आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत.

अशोक सराफ यांचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्यासोबत झाले असून त्यांना अनिकेत हा मुलगा आहे. बॉलिवूड अथवा मराठी इंडस्ट्रीतील अनेक सुपरस्टारची मुलं आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून याच क्षेत्रात करियर करताना दिसतात. केवळ बॉलिवूडमध्ये नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्याला तोच ट्रेंड पाहायला मिळतोय. सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया, महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ, विजय चव्हाण यांचा मुलगा वरद, निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि मुलगी स्वानंदी आपल्या आई वडिलांप्रमाणेच याच क्षेत्रात करियर करत आहेत आणि यातील अनेकांना या क्षेत्रात चांगले यश देखील मिळाले आहे. पण अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्याला अभिनयात, दिग्दर्शनात किंवा चित्रपटाची निर्मिती करण्यात अजिबातच रस नाहीये.

अनिकेत काही वेळा त्याच्या आई वडिलांसोबत कार्यक्रमांना हजेरी नक्कीच लावतो. पण या क्षेत्राविषयी त्याला अजिबातच प्रेम नाहीये. त्याला रस आहे जेवण बनवण्यात. तो खूप चांगला शेफ असून तो पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबला निक सराफ या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत. त्याच्या या व्हिडिओला अनेकांनी लाइक केले असून या व्हिडिओंना खूप चांगले व्ह्यूज मिळतात. अनिकेत सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून त्याचे अनेक फोटो तो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.

टॅग्स :अशोक सराफ