Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशोक सराफ पहिल्यांदाच पद्मिनी कोल्हापूरेसह करणार 'प्रवास'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 17:38 IST

आयुष्याच्या प्रवासाचा एक आगळावेगळा दृष्टिकोन दाखविणाऱ्या ‘प्रवास’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच दिमाखात संपन्न झाला.

‘प्रवास’ आपल्या प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग असतो. जन्मापासून सुरु झालेला हा ‘प्रवास’ प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही नवं शिकवत असतो आणि सोबत अनुभव संपन्न करत असतो. आयुष्याच्या प्रवासाचा एक आगळावेगळा दृष्टिकोन दाखविणाऱ्या ‘प्रवास’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच दिमाखात संपन्न झाला.  

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे अशी वेगळी जोडी ‘प्रवास’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपल्यासमोर येणार आहे. सोबत विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर आदि कलाकार यात असणार आहेत.

५० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एका वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मिळत असल्याचा आनंद व्यक्त करतानाच  हा ‘प्रवास’ प्रेक्षकांनाही एक वेगळी अनुभूती देईल, असा विश्वास अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केला. ‘प्रवास’ च्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर मराठीत काम करायला मिळाल्याचा आनंद अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी व्यक्त केला. ‘जे शेष आहे ते विशेष आहे’ असं सांगणारा हा ‘प्रवास’ माझ्यासाठी ही तितकाच महत्त्वपूर्ण असून माझ्या या दिग्दर्शकीय प्रवासात दिग्ग्जांची मला मिळालेली साथ मला बरंच काही शिकवून जाईल, असा विश्वास दिग्दर्शक शशांक उदापूरकर व्यक्त करतात. कलेच्या क्षेत्रात ‘प्रवास’ करण्याची माझी इच्छा या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली असल्याची भावना व्यक्त करताना निर्माते ओम छंगानी यांनी सर्व कलाकारांचे यावेळी आभार मानले.

या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. ओम छंगानी फिल्म्स निर्मित ‘प्रवास’ या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी सांभाळली आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सलीम सुलेमान यांचा मराठी चित्रपटसृष्टीतला ‘प्रवास’ या निमित्ताने सुरु झाला आहे. गीतलेखन गुरु ठाकूर यांचे आहे. कलादिग्दर्शक महेश साळगांवकर तर संकलन संजय सांकला यांचे आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. रंगभूषा श्रीकांत देसाई तर वेशभूषा ताशीन अन्वारी, दिप्ती सुतार यांची आहे.

 

टॅग्स :अशोक सराफपद्मिनी कोल्हापुरे