Ashish Bende Receives National Award: ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा गेल्या ऑगस्ट महिन्यात झाली होती, आणि आज (२३ सप्टेंबर) भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या प्रतिष्ठित सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. मराठीतील युवा दिग्दर्शक आशिष बेंडेला त्याच्या 'आत्मापॅम्फ्लेट' (Aatmapamphlet) या चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट दिग्दर्शक' (Best Debut Film of a Director) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे आशिष बेंडेच्या दिग्दर्शन कौशल्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे.
दिग्दर्शक आशिष बेंडे याने 'आत्मपॅम्फलेट' या सिनेमातून दिग्दर्शकीय पदार्पण केले होते. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आशिष बेंडे हा उपस्थित होता. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याने प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला.
आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या सिनेमाचे लेखन 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी' आणि 'वाळवी' यांसारख्या भन्नाट सिनेमे देणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. एखाद्या फास्ट रोलर कोस्टर राईडसारखी, तिरकस विनोदी शैली चित्रपटाची आहे. सर्व वयोगटासाठी हा चित्रपट आहे. ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांनी आत्मपॅम्फलेट या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारलेली आहे.
दरम्यान, यंदा शाहरुख खानला तब्बल ३३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रांत मेसी आणि शाहरुख खान यांना विभागून देण्यात आला आहे. तर, राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. यासह यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला आहे.