'अशी ही बनवाबनवी' सिनेमा चांगलाच गाजला. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला नुकतीच ३७ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सिनेमातील अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या आठवणी जागवण्यात आला. 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, सुशांत रे हे कलाकार आज हयात नाहीत. याच सिनेमात बंगल्याच्या मालकीण लीलाबाई काळभोर यांची भूमिका अभिनेत्री नयनतारा यांनी साकारली. सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या नयनतारांच्या आयुष्याचा शेवट मात्र अत्यंत दुःखद होता.
मधुमेह झाल्याने पाय कापाला लागला अन्...
७० च्या दशकात नयनतारांनी मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. उत्कृष्ट अभिनयामुळे आणि विनोदाच्या उत्तम टायमिंगमुळे नयनतारा यांना अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली. अशातच 'अशी ही बनवाबनवी' सिनेमात नयनातारांनी साकारलेली लीलाबाई काळभोर ही भूमिका चांगलीच गाजली. पुढेही सिनेमांतून आणि नाटकांमधून नयनतारा विविध भूमिका करुन प्रेक्षकांना खळखळून हसवत होत्या. नयनतारा आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीचं 'शांतेचं कार्ट चालू आहे' हे नाटक रंगभूमीवर धुमाकुळ घालत होत. कायम हसतमुख व्यक्तिमत्व असलेल्या नयनतारांच्या आयुष्याचा शेवट मात्र दुःखद झाला.
नयनतारा यांना मधुमेह (diabetes) झाला होता. हा आजार इतका टोकाला गेला की नयनतारा यांचा एक पाय यामुळे कापावा लागला. त्यामुळे नयनतारा यांनी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या नयनतारा यांना घरी बसावं लागलं. आयुष्याच्या शेवटच्या १० वर्षात त्यांनी इंडस्ट्रीपासून आणि अभिनयक्षेत्रापासून ब्रेक घेतला. त्यांची प्रकृती बिघडलेली असायची. अखेर ३० नोव्हेंबर २०१४ रोजी नयनतारांनी जगाचा निरोप घेतला. आजही नयनतारांच्या भूमिका आठवल्या की प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू येतं. पण प्रत्यक्षात मात्र अभिनेत्रीचं आयुष्य वेदनादायी होतं.