Join us

अलका कुबल यांनी मराठी नाही तर हिंदी सिनेमातून केलं होतं पदार्पण, स्मिता पाटीलसह केलं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 09:00 IST

अलका कुबल या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असल्या तरी त्यांचा डेब्यू सिनेमा हा हिंदी होता हे खूप कमी जणांना माहित असेल.

सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मराठी अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal). 'माहेरची साडी' या सिनेमातून त्या घराघरात पोहोचल्या. त्यांच्या  अभिनयानं प्रेक्षकही ढसाढसा रडले. अलका कुबल या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असल्या तरी त्यांचा डेब्यू सिनेमा हा हिंदी होता हे खूप कमी जणांना माहित असेल. होय त्यांनी बॉलिवूड सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

नुकत्याच एका मुलाखतीत अलका यांनी सिनेसृष्टीत पदार्पण कसं झालं त्याबद्दल सांगितलं. अलका कुबल म्हणाल्या,"नटसम्राट नाटकात बालकलाकाराची भूमिका साकारत असताना माझ्यासोबत सुरेन फातर्पेकर नावाचे नट होते. त्यांनी एका हिंदी सिनेमासाठी माझं नाव सुचवलं होतं. तेव्हा मी १५ वर्षांची होते. सिनेमात माझी फारही मोठी भूमिका नव्हती पण मी हा सिनेमा करावा अशी त्यांची इच्छा होती. स्क्रीनटेस्ट झाली आणि माझी निवडही झाली. तो सिनेमा होता 'चक्र'. यामध्ये काम करायला होकार देण्याचं आणखी एक कारण म्हणजे सिनेमात खुद्द अभिनेत्री स्मिता पाटील होत्या."

त्या पुढे म्हणाल्या,"माझं दहावीचं वर्ष होतं तरी मी केवळ स्मिता पाटील यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळणार म्हणून मी तयार झाले. मी सेटवर अभ्यास करायचे हे बघून त्यांना माझं कौतुक वाटलं होतं. कामाप्रती निष्ठा काय असते हे मी त्यांच्याकडून शिकले. आठ-दहा दिवस मी सेटवर गेले होते तेव्हा मी त्यांच्याकडे एकटक बघत बसायचे. तो अनुभव खरंच खास होता."

टॅग्स :अलका कुबलमराठी अभिनेताबॉलिवूडस्मिता पाटील