बॉलिवूडमधील कपूर कुटुंबीय हे लोकप्रिय आहे. कपूर कुटुंबीयांचं बॉलिवूड सिनेसृष्टीत मोठं योगदान आहे. आजही कपूर कुटुंबातील काही जण अभिनयात करिअर करत आहेत. या कपूर कुटुंबीयांतील तिघांसोबत काम करण्याचा योग मराठी अभिनेत्याला आला. याबाद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. हा अभिनेता म्हणजे मराठी सिनेसृष्टी गाजवणारे अजिंक्य देव आहेत.
अजिंक्य देव हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते. त्यांनी अभिनयाने एक काळ गाजवला. ८०-९०च्या दशकातील हँडसम अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आजही ते तितकेच हँडसम आणि फिट दिसतात. मराठीसोबतच त्यांनी बॉलिवूडही गाजवलं आहे. आता ते कपूर कुटुंबीयांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. करिश्मा कपूर, नीतू कपूर आणि रणबीर कपूर यांच्यासोबत अजिंक्य देव नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत. हे तिन्ही वेगवेगळे प्रोजेक्ट असणार आहेत. याबाबत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.
करिश्मा कपूर, नीतू कपूर आणि रणबीर कपूर यांच्यासोबतचे फोटो अजिंक्य देव यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. "गेल्या वर्षभरात तीन वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये तिन्ही कपूरसोबत काम करण्याची संधी मिळाली. आता या प्रोजेक्टच्या रिलीजची वाट पाहत आहे", असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. अजिंक्य देव यांच्या या नव्या प्रोजेक्टची चाहत्यांनीही उत्सुकता आहे.