अभिनेत्री तेजस्विनी लोणारीला (Tejaswini Lonari) आपण अनेक मराठी सिनेमांमध्ये पाहिलंच आहे. मकरंद अनासपुरेंसोबत तिचे बरेच सिनेमे आले. 'गुलदस्ता', 'वाँटेड बायको नंबर वन', 'अफलातून', 'बर्नी' अशा काही सिनेमांमध्ये ती झळकली. नुकतंच २०२३ साली तिचा मकरंद अनासपुरेंसोबतच 'छापा काटा' रिलीज झाला होता. अनेक वर्षांनी ही जोडी पडद्यावर एकत्र दिसली. आता तेजस्विनीने तिच्या नवीन इनिंगला सुरुवात केली आहे. तिने स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरु केलं आहे.
तेजस्विनी लोणारीने काल गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तिने प्रोडक्शन कंपनीचा लोगो आणि टायटल रिव्हील करत लिहिले, "आज एक खास दिवस, एक खास क्षण आणि माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण…मी माझ्या 'तेजक्राफ्ट प्रोडक्शन'चा लोगो लॉन्च करत आहे! हा एक मोठा टप्पा आहे, एक स्वप्न साकार होत आहे, आणि यामागे खूप मेहनत, जिद्द आणि समर्पण आहे.
तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं! आशा आहे की तुम्ही सगळे माझ्या या प्रवासात माझ्यासोबत असाल, साथ द्याल आणि हा सुंदर क्षण माझ्यासोबत साजरा कराल.धन्यवाद आणि चला, हा प्रवास एकत्र एन्जॉय करूया!"
तेजस्विनीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या प्रोडक्शनच्या माध्यमातून तेजस्विनी कोणकोणत्या नव्या गोष्टी घेऊन येते आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करते याची सर्वांनाच उत्सुकता आहे.