Join us

लक्ष्याचा लेक आता रंगभूमी गाजवणार, अभिनय बेर्डेचं 'आज्जीबाई जोरात' नाटकातून पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 15:28 IST

लक्ष्याच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण, 'आज्जीबाई जोरात' नाटकातून अभिनय बेर्डे प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या अभिनय आणि कॉमेडीने एक काळ गाजवणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिले. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनय बेर्डेने अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं. 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. अनेक सिनेमांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता अभिनय रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. 

अभिनय बेर्डे लवकरच रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. अभिनय 'आज्जीबाई जोरात' या नाटकातून मराठी रंगभूमीच्या मंचावर पाऊल ठेवणार आहे. याबाबत पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांना माहिती दिली आहे. "तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि आईबाबांच्या आशीर्वादाने आज नाटकात पहिलं पाऊल टाकतोय! माझं पाहिलं व्यावसायिक मराठी नाटक, आज्जीबाई जोरात!", असं म्हणत त्याने पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट करत अभिनयला शुभेच्छा दिल्या आहेत. आज्जीबाई जोरात हे पहिलं AI महाबालनाट्य आहे. क्षितीज पटवर्धनने हे नाटक लिहिलं आहे. ३० एप्रिलपासून या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. 

अभिनयला घरातूनतच अभिनयाचं बाळकडू मिळालं. अभिनयची आई प्रिया बेर्डे यादेखील मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अभिनयने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'अशी ही आशिकी', 'मन रे कस्तुरी', 'रंपाट', 'बांबू', 'बॉइज ४' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक आणि अभिनयची बहीण स्वानंदी बेर्डेही अभिनयातील करिअरला सुरुवात करत आहे. 

टॅग्स :अभिनय बेर्डेमराठी अभिनेता