Join us

"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:00 IST

"अनेकदा तोंडाशी आलेला घास गेला...", आस्ताद स्पष्टच बोलला

मराठी अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) नाटक, मालिका, सिनेमांमधून नावारुपाला आला आहे. 'असंभव', 'वादळवाट' या गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. नुकताच आलेल्या 'छावा' सिनेमात त्याचा काही मिनिटांचाच रोल होता. सिनेमाच्या रिलीजनंतर अनेक महिन्यांनी आस्तादने फेसबुकवर पोस्टवर करत सिनेमाच्या अनेक चुका दाखवल्या. त्यावर टीकाही केली. मात्र नंतर त्याने पोस्ट डिलीट केल्या. त्यावर आस्तादने एका मुलाखतीत स्पष्टीकरणही दिलं. याच मुलाखतीत आस्तादने हिंदी ऑडिशन्सचा अनुभव सांगितला.

आस्ताद काळेने नुकतीच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, "हिंदीच्या ऑडिशन देणं मी एकेकाळी बंद केलं होतं. मला त्याचा कंटाळाच आला होता. कारण ते तुम्हाला बोलवायचे लीडच्या रोलसाठी आणि मग ऑडिशन झाली की २ मिनिट थांबा म्हणायचे. मग आणखी एक कॅरेक्टर करायला लावायचे जे कॉमेडी किंवा नोकराच्या भूमिकेचं असायचं. मला नोकराची भूमिका करण्यात कमीपणा वाटणार नाही पण केवळ मी मराठी आहे आणि माझा हिंदी टोन असा आहे म्हणून तुम्ही मला ही भूमिका देणार असाल तर सॉरी. मी ते करणार नाही. तुम्हाला पंजाबी, बंगाली टोनमध्ये बोललेली हिंदी चालते मग मराठी टोनमधली हिंदी का चालत नाही? म्हणून मी बंद केलं."

"पूर्वी हिंदी ऑडिशन वॉक इन असायच्या. आता कास्टिंग एजन्सीजकडून फोन येतात. पण मला ते अजून क्रॅक करता आलेले नाहीत. वेबसीरिजसाठी मी बऱ्याच ऑडिशन दिल्या पण माझी निवडच होत नाही. काहीतरी कमी पडतंय. नक्की काय होतंय याचा माझा अभ्यास सुरु आहे. मी शॉर्टलिस्ट होतो पण घोडं पुढे जात नाहीये. नुकतंच तीन वेबसीरिज माझ्या हातातून गेल्या. खूप इंटरेस्टिंग भूमिका होत्या. असं वाटलं होतं यात होईल पण हातातोंडाशी आलेला घास जातो."

टॅग्स :अस्ताद काळेमराठी अभिनेता