Join us

भारतीय संविधान आणि हक्कांची जाणीव करुन देणारा महत्वाचा विषय, 'या' दिवशी रिलीज होणार '२६ नोव्हेंबर' चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:21 IST

अनिकेत विश्वासराव-सयाजी शिंदे या कलाकारांची मुख्य भूमिका असलेला ‘२६ नोव्हेंबर’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा विषय खूप महत्वाचा आहे

मराठी सिनेसृष्टीत एका नव्या सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे ‘२६ नोव्हेंबर’. अनिकेत विश्वासराव-सयाजी शिंदे या कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा झाली आहे.  हा केवळ चित्रपट नसून, ही एक चळवळ आहे. अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार निर्मित, सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ हा घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा महत्त्वाचा चित्रपट आहे. जाणून घ्या या चित्रपटाविषयी.  

'२६ नोव्हेंबर' हा चित्रपट त्याच्या शक्तिशाली कथाकथनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना केवळ भावनिक करणार नाही, तर त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची नवी प्रेरणा देईल. हा सिनेमा नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी उभा राहिलेला एक प्रेरणादायी आवाज आहे. असे निर्माते अनिल कुमार जवादे आणि कार्यकारी निर्माते निलेश ओंकार यांचे एकमत आले.

'२६ नोव्हेंबर' हा चित्रपट गरिबांमधील आर्थिक असमानता आणि त्यांच्या शोषणाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकतो. तो त्यांना भारतीय संविधानाने दिलेल्या त्यांच्या स्वतःच्या हक्कांसाठी लढण्यास शिकवतो आणि प्रेरित करतो. संविधान कोणत्याही एका विशिष्ट जातीचे, समुदायाचे किंवा धर्माचे नाही तर ते देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अस्तित्वात आहे हे हा चित्रपट आपल्या खास शैलीद्वारे लोकांना पटवून देतो. प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलाला प्राथमिक स्तरापासूनच संविधानाचे महत्त्व शिकवले गेले पाहिजे आणि प्रत्येक घरात संविधानाची प्रत कशी असावी याचा देखील हा चित्रपट आग्रह धरतो. 

चित्रपटाचे संगीत अर्थपूर्ण आणि सुरेल आहे. चित्रपटाची गीते प्रदर्शित होताच त्यांची लोकप्रियता वाढत आहे. चित्रपटातील एक रोमँटिक गाणे स्वप्नील बांदोडकर आणि आर्या आंबेकर यांनी गायले आहे तर दमदार शीर्षक गीत आदर्श शिंदे, पी. गणेश आणि तेजस्वी राय यांनी गायले आहे. गीतकार सचिन उराडे यांनी लिहिलेले चित्रपटातील दुःखद गाणे चित्रपटातील दमदार परिस्थिती प्रतिबिंबित करते. हे गीत प्रसिद्ध गायक जावेद अली यांनी गायले आहे. चित्रपटाच्या शेवटी आणखी एक दमदार गाणे आहे जे गौरव चाटी यांनी गायले आहे. चित्रपटातील चारपैकी तीन गाणी निलेश ओंकार यांनी लिहिली आहेत तर अमर प्रभाकर देसाई आणि स्वप्नील राजेश चौधरी यांनी संगीतबद्ध केले आहे. त्यांचे संगीत या चित्रपटाला एका वेगळ्याच पातळीवर आणि उंचीवर घेऊन जाते.

येत्या ९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्माते अनिल कुमार जवादे यांनी दिली. या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, सयाजी शिंदे, विजय पाटकर, गणेश यादव, मुश्ताक खान, भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, डॉ. जुई जवादे, डॉ. विलास उजवणे आणि अंजली उजवणे यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. चित्रपटाच्या मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी प्रमुखाची धुरा श्री. गिरीश वानखेडे यांनी प्रभावी सांभाळली आहे. पॅनोरमा स्टुडिओज तर्फे या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन होणार असल्याने हा चित्रपट विशेष आहे.

टॅग्स :अनिकेत विश्वासरावसयाजी शिंदेमराठी अभिनेतामराठी चित्रपट