Pooja Sawant: मराठी मनोरंजनविश्वातील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत (Pooja Sawant). अभिनेत्री पूजा सावंत कायमच चर्चेत असते. आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या पूजाने सिनेसृष्टीत जम बसवला. पूजा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पूजा सावंतने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पत्र लिहिताना दिसते आहे. दरम्यान, हे पत्र तिने श्री स्वामी समर्थांना उद्देशून लिहिलं आहे. पूजाने नेमकं या पत्रात काय लिहिलंय? जाणून घेऊया... या पत्रामध्ये अभिनेत्रीने लिहिलंय की, "प्रिय स्वामी! परवा सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली. देवाकडे फेसबुक नाही, इन्स्टाग्राम नाही पण स्वत:चा पत्ता आहे. मुक्काम पोस्ट देवाचं घर. खरंच किती दिवस झाले ना कोणाला पत्र लिहून, म्हणून आज मी थेट तुम्हालाच पत्र लिहिते. आज मी माझ्यासाठी काहीही मागणार नाही, पण तुमच्या दत्त अवतारातील पायाशी जे चौघे उभे आहेत ना मी त्यांच्यासाठी मागणार आहे."
पुढे अभिनेत्री म्हणते, "स्वामी या जगात कुठलाही मुका प्राणी जेव्हा एका संकटात असेल तेव्हा आपल्यातील कोणीतरी त्यांचा देव बनून त्यांच्या मदतील जाईल आणि त्या मुक्या प्राण्याला मदत करेल ही बुद्धी जगातील सगळ्यांना द्या, हीच माझी विनंती. तसंच मला इतकं सक्षम बनवा की मी या भूतदयेच्या कामात कधीही कमी पडणार नाही. बाकी सगळं ठीक आहे. पण सध्या माझा पत्ता बदलला आहे. पण मी जगाच्या कुठल्याही भागात असले तरीही मन मोकळं करण्याच्या निमित्तानं तुम्हाला पत्र पाठवायला तुमचा पत्ता मला सापडलाय. स्वामी लक्ष असूद्या! तुमचीच पूजा. मुक्काम, पोस्ट-देवाचं घर, श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट, जिल्हा-सोलापूर..."