Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली खरेचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 18:53 IST

Sonali khare: एकेकाळी अभिनयाच्या जोरावर तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनालीने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे. उत्तम अभिनयासह सोनाली तिच्या फिटनेसमुळेही कायम चर्चेत असते. एका मुलीची आई असूनही तिचा फिटनेस २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असाच आहे. सोनालीचा पूर्वीपेक्षा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच आता तिने एक मोठी घोषणा केली आहे.

एकेकाळी अभिनयाच्या जोरावर तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनालीने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सोनालीने मदर्स डेचं निमित्त साधत तिच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सोनालीने ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन हाऊसची घोषणा केली असून या अंतर्गत तिचा 'मायलेक' हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात आई आणि मुलीच्या सुंदर, हळव्या नात्यावर भाष्य करण्यात येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. यामध्ये आई आणि मुलीच्या नात्याचे आंबटगोड स्वरूप दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. मायलेकीच्या नात्यातील जिव्हाळा, प्रेम आणि एक वेगळीच कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 

"मी निर्मित केलेला हा पहिला चित्रपट आहे. मातृदिन हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास असतो. आईचे एक वेगळे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात असते. मुलगी आणि आईच्या नाजुक नात्यावर बोलणारा हा चित्रपट आहे. या खासदिनी माझा पहिला चित्रपट ‘मायलेक'ची घोषणा करणे, हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. लवकरच ‘मायलेक’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून हळूहळू अनेक गोष्टी समोर येतील," असं सोनाली म्हणाली.दरम्यान, या चित्रपटाचे लेखन एमेरा यांनी केले असून छायाचित्रण मृदुल सेन यांनी केले आहे. सोनाली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच काही रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली आहे. 

टॅग्स :सोनाली खरेसेलिब्रिटीसिनेमा