Join us

एका वर्षानंतरही मिळाले नाहीत कामाचे पैसे, मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली- "मला आता पश्चाताप होतोय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:18 IST

अभिनेत्री मीरा जोशीचे कामाचे पैसे थकले आहेत. एक वर्ष उलटूनही तिला पैसे मिळाले नसल्याने मीराने सोशल मीडियावरुन याबाबत संताप व्यक्त केला आहे.

काम करूनही अनेकदा कलाकारांना त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाहीत. स्वत:च्या हक्कांच्या पैशांसाठीही कलाकारांना निर्मात्यांकडे विनवण्या कराव्या लागतात. वारंवार सिनेसृष्टीतून या गोष्टी समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी सुयश टिळकसोबत असा प्रसंग घडला होता. आता मराठी अभिनेत्रीला हा अनुभव आला आहे. अभिनेत्री मीरा जोशीचे कामाचे पैसे थकले आहेत. एक वर्ष उलटूनही तिला पैसे मिळाले नसल्याने मीराने सोशल मीडियावरुन याबाबत संताप व्यक्त केला आहे. 

मीराने गेल्या वर्षी एका सिनेमासाठी काम केलं होतं. पण, अद्याप तिला याचे पैसे मिळालेले नाहीत. याबाबत तिने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत घडलेला प्रकार सांगितला आहे. 

मीरा जोशीसोबत काय घडलं? 

"नोव्हेंबर २०२३मध्ये मी जिद्दी सनम नावाचा सिनेमा केला होता. तेव्हापासून मी माझ्या कामाचे पैसे मिळण्याची वाट पाहतेय. आता एक वर्षाहून अधिक वेळ झाला आहे. तेव्हापासून मी निर्माती टीमशी बोलतेय. cintaaofficial कडे तक्रार केली आहे. काही मराठी असोशिएन्सशी बोलत आहे. पण, कोणाचीच मदत झाली नाही. cintaaofficial तक्रार नोंदविण्यासाठी काही पैसेही घेतले. पण, काही उपयोग झालेला नाही. माझे पैसे मिळवण्यासाठी मी सर्व काही केलं. पण, अजून मला एक रुपयाही मिळालेला नाही. 

 

४, ५ आणि ६ नोव्हेंबर २०२३ रोजी मी त्यांच्यासाठी शूट केलं होतं. पहिल्या शेड्युलनंतर एका आठवड्यात पैसे दिले जातील, असं मला सांगण्यात आलं होतं. शेवटच्या क्षणी माझं कास्टिंग झालं होतं. त्यामुळे अॅग्रीमेंट बनविण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. अॅग्रीमेंट नसल्यामुळे व्हॉट्स अॅप चॅट हा पुरावा पोलीस ग्राह्य धरू शकत नाहीत. मला आता कुठलाच पर्याय दिसत नसल्याने हा मुद्दा मी इथे उपस्थित करण्याचं ठरवलं. 

मेलमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांची परिस्थिती समजून घेत १ वर्ष वाट पाहिली. माझ्याप्रमाणेच टीममधील आणखी काही जणांनाही त्यांच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत. हो, ही माझीच चूक आहे की मी तुमच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मला ३ नोव्हेंबरला कास्टिंगसाठी रात्री उशिरा कॉल केला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी शूटिंगला गेले. त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतला याचा आता मला पश्चाताप होतोय. त्यांच्याकडे अॅग्रीमेंट बनवायला वेळ नव्हता. पण, पहिल्या शेड्युलनंतर अॅग्रीमेंट बनवतील असा विश्वास त्यांच्यावर ठेवणं, ही मोठी चूक होती. 

मीराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये निर्मात्यांची नावं, आणि मेलचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केल्याचं मीराने म्हटलं आहे. 

टॅग्स :मीरा जोशीटिव्ही कलाकार