अवधूत गुप्ते, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि अमेय खोपकर (एव्हीके पिक्चर्स) यांच्या वतीने 'रंगकर्मी धुळवड २०२५' चे आयोजन करण्यात आले होते. यात अवघी मराठी सिनेसृष्टी विविध रंगात रंगली. रंगांची उधळण, संगीत, धमाल, नृत्य, मजामस्ती या सगळ्याचा त्यांनी एकत्र येत आनंद लुटला. या वेळी सई ताम्हणकर, भरत जाधव, सुबोध भावे, प्रसाद ओक, आदिनाथ कोठारे, अभिजीत खांडकेकर, समीर चौघुले, ईशा डे, किशोरी शहाणे, राजेश मापुस्कर, रवी जाधव, हृषीकेश जोशी, सचिन गोस्वामी, सचिन मोटे, सचिन खेडेकर, सचित पाटील, संतोष जुवेकर, श्रुती मराठे, आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, रोहित राऊत, सावनी रवींद्र, आनंदी जोशी, वनिता खरात आदी कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आगामी 'गुलकंद' चित्रपटातील 'चंचल' या गाण्याचे आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांनी लाईव्ह सादरीकरण केले. तर कलाकार मित्रांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’चे टिझरही लाँच करण्यात आले.
अवधूत गुप्ते म्हणतात, "होळीचा सण आपल्या जीवनात रंग, आनंद आणतात. या खास कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि त्यात चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती असणे, हे अत्यंत आनंददायक आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार एकत्र येऊन रंगांची धुळवड साजरी केली. एकतर कलाकारांना त्याच्या बिझी शेड्यूलमधून वेळच मिळत नाही. त्यामुळे अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांच्या निमिताने एकत्र येऊन धमाल करता येते, म्हणूनच खास या 'रंगकर्मी धुळवड २०२५' चे आयोजन करण्यात आले होते.''
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट संजय छाब्रिया म्हणतात, " रंगपंचमी हा फक्त रंगांचा खेळ नसून तो आनंद, मैत्री आणि समाजातील बंद मजबूत करणारा सण आहे. आज या निमित्ताने मराठी इंडस्ट्री एकत्र आली. यानिमित्ताने आमच्या 'गुलकंद' चित्रपटातील कलाकारांनीही पुन्हा एकत्र येत धमाल केली. अतिशय चैतन्यमय असा हा क्षण आहे.
एव्हीके पिक्चर्सचे अमेय खोपकर म्हणतात ," होळी म्हणजे फक्त रंगाचा सण नाही तर आपुलकी आणि एकतेचा सण असतो. यानिमित्ताने एकमेकांमधील नातेसंबंधांची दृढ होतात. आज येरे येरे पैसा ३’ची टीमही या आनंदात सहभागी झाली. या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले. सगळी इंडस्ट्री एकत्र येऊन सणाचा आनंद लुटते आणि तेच महत्वाचे आहे.''
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अमेय खोपकर, अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, अजित परब, अवधूत वाडकर, मंदार वाडकर, निनाद बत्तीन आणि अभिजित पानसे यांनी केले होते.