बॉलिवूडमध्ये असे अनेक गाजलेले सिनेमे आहेत ज्यांचे सिक्वेलही प्रदर्शित झाले आहेत. अशाच सिनेमांपैकी एक म्हणजे 'धमाल'. २००७ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही त्यातील डायलॉग प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. आता या सिनेमाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि विशेष म्हणजे या सिनेमात मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेंची वर्णी लागली आहे.
'धमाल' सिनेमात विजय पाटकर, रितेश देशमुख, विनय आपटे हे मराठमोळे चेहरे दिसले होते. रितेश देशमुख या सिनेमाच्या बाकीच्या सीक्वेलमध्येही दिसला. आता 'धमाल ४'मध्येही रितेशसोबत उपेंद्र लिमयेदेखील दिसणार आहेत. नुकतंच या सिनेमाचं पहिल्या शेड्युलचं शूटिंग माळशेज घाटात पूर्ण झालं आहे. 'धमाल ४'च्या शूटिंगच्या सेटवरील काही फोटो उपेंद्र लिमयेंनी शेअर केले आहेत. याआधी अॅनिमल, मडगांव एक्सप्रेस, देवा या बॉलिवूड सिनेमांमध्ये ते दिसले. आता 'धमाल ४'मध्ये त्यांना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
धमाल २००७ मध्ये धमाल पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. यानंतर २०११ मध्ये धमालचा सिक्वेल आला. यानंतर २०१९मध्ये धमालचा तिसरा भाग 'टोटल धमाल' आला. ज्यामध्ये अजय देवगण, माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांसारख्या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारली होती. आता 'धमाल ४' येतोय हे कळताच प्रेक्षक खूश झाले आहेत. चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.