Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकी कौशलच्या 'छावा'मध्ये 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्याची वर्णी? पोस्ट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 13:11 IST

Vikcy Kaushal Chhaava Movie : विकी कौशलच्या 'छावा' या ऐतिहासिक सिनेमात लोकप्रिय मराठी अभिनेता झळकण्याची शक्यता आहे. 

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या आगामी 'छावा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. विकी कौशलच्या या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अलिकडेच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर पाहून चाहत्यांची 'छावा' सिनेमाबाबत उत्सुकता वाढली आहे. विकी कौशलच्या या ऐतिहासिक सिनेमात लोकप्रिय मराठी अभिनेता झळकण्याची शक्यता आहे. 

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे अभिनेता 'छावा' सिनेमात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सुव्रत जोशी आहे. सुव्रतने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन छावा सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने "जय शिवराय, जय शंभुराजे" असं कॅप्शन दिलं आहे. सुव्रतने या सिनेमात कोणती भूमिका साकारणार, याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. पण, त्याच्या या पोस्टमुळे छावा सिनेमात त्याची वर्णी लागली असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

सुव्रतने याआधी अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'गोष्ट एका पैठणीची', 'शिकारी', 'मन फकिरा', 'अनन्या' या सिनेमांमध्ये तो दिसला होता. तर ताली या सुष्मिता सेनच्या वेब सीरिजमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता छावा सिनेमात ऐतिहासिक भूमिकेत त्याला बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

दरम्यान, 'छावा' सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या टीझरमध्ये विकीचं रौद्ररुप पाहायला मिळत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलला पाहणं ही एक पर्वणी असणार आहे.  या सिनेमात रश्मिका मंदाना येसूबाईंची भूमिका साकारत आहे. तर संतोष जुवेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ६ डिसेंबरला 'छावा' सिनेमा रिलीज होणार आहे. मॅडॉक फिल्मने या सिनेमाची निर्मिती केलीय. 

टॅग्स :विकी कौशलसुव्रत जोशीमराठी अभिनेताटिव्ही कलाकार