Sushant Shelar Post: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'छावा' (chhaava) सिनेमाला प्रेक्षकांचा अजूनही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात अनेक मराठमोळे चेहरे देखील पाहायला मिळत आहेत. दरम्यान, 'छावा'मध्ये रायाजी मालगे ही भूमिका साकारणारा अभिनेता संतोष जुवेकर प्रचंड चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून संतोष जुवेकरला (Santosh Juvekar)सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. छावाच्या शूटिंगदरम्यान, औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नासोबत आपण एकही शब्द बोललो नाही, या त्याच्या वक्तव्याने नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं. संतोष जुवेकरच्या होणाऱ्या ट्रोलिंगचा निषेध करत मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यात आता अभिनेता सुशांत शेलारने (Sushant Shelar) मित्र संतोष जुवेकरच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री रुचिरा जाधव, धनंजय पोवार अवधूत गुप्तेने यांच्या पाठोपाठ सुशांत शेलारने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहून ट्रोलर्सना चांगलच सुनावलं आहे. सुशांत शेलारने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "खरं सांगायचं तर, आजकाल एखाद्याने प्रामाणिकपणे आपली मतं मांडली, की लगेच काही लोक ट्रोलिंगच्या मागे लागतात. आणि जेव्हा आपला एखादा खास मित्र अशा गोष्टींचा सामना करत असतो, तेव्हा मन हेलावून जातं. संतोष जुवेकर हा फक्त एक अभिनेता नाही, तर आपल्या भूमिकांमधून जनतेच्या मनात घर करणारा संवेदनशील कलाकार आहे. त्याने समाजप्रवाहात झोकून दिलेलं योगदान आणि त्याची स्पष्टवक्तेपणा हीच त्याची खरी ताकद आहे. पण दुर्दैवाने, काही लोक ही ताकद दुर्बलता समजतात आणि जाणीवपूर्वक त्याला लक्ष्य करत आहेत."
"मित्रा संतोष, हे सगळं तू पाहूनसुद्धा शांत आहेस, कारण तुला माहीत आहे – वेळच खरं उत्तर देते. पण तरीही, एक खरा मित्र म्हणून मला आज तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते. या ट्रोलिंगमागं आहे द्वेष, असुरक्षितता, पण तुझ्या मागे आहे प्रेम, आदर आणि माणुसकी. तू केलेल्या अशा कितीतरी भूमिकेतून तू लोकांना प्रेरणा दिलीस. त्यांची साथ आज तुझ्यासोबत आहेच आणि आम्ही सुद्धा पूर्ण ताकदीनं, मनापासून. दुरून आवाज करणाऱ्यांना सोडून दे – कारण ते कधीच आपल्या जवळ येत नसतात. "संतोष, तू खंबीर उभा राहा. तू एकटाच नाहीस. We Are There With You."तुझा मित्र, सुशांत... असं लिहित अभिनेत्याने नेटकऱ्यांचे कान टोचले आहेत.